Join us  

Eknath Shinde Speech : भुजबळांमुळे ४० दिवस जेलमध्ये राहावं लागलं; मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला बेळगावचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 6:00 PM

Eknath Shinde Speech : रविवारी तुरुंगात देण्यात येणारी अंडी आणि नॉनव्हेज सुद्धा आम्ही तुरुंगात असताना बंद केली, खूप हाल झाले, असे शिंदे म्हणाले. 

मुंबई : विधानसभेच्या विशेष अधिवेशनात रविवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची पहिली लढाई शिंदे सरकारने जिंकली आणि भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर 164 मतांनी अध्यक्षपदी विराजमान झाले. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात अभिनंदन प्रस्तावावर जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी राजकीय प्रवास आणि कौटुंबिक माहिती देत मला कोणत्याही पदाची लालसा नसल्याचं त्यांनी म्हटले. तसेच अनेक जुने राजकीय किस्से त्यांनी सांगितले. दरम्यान राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे शिवसेनेत असताना शिंदे यांना बेळगाव येथे ४० दिवस तुरुंगात काढावे लागले. तसेच रविवारी तुरुंगात देण्यात येणारी अंडी आणि नॉनव्हेज सुद्धा आम्ही तुरुंगात असताना बंद केली, खूप हाल झाले, असे शिंदे म्हणाले. 

विधानपरिषद निवडणूकीत दोन उमेदवार निवडून आले पाहिजेत असे मी आमदारांना सांगितलं. नाहीतर, जाताना जर उमेदवार पडला तर गद्दारी केली असे म्हणतील. तेव्हा साहेबांनी फोन केला, आपले आमदार पुढे जातायत तुम्ही कुठं आहेत, तेव्हा ते पुढं चाललेत पण मी कुठं चाललोय ते मला माहिती नव्हतं, असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. काही प्लॅनिंग नाही केलं, मी बोलत-बोलत गेलो. यावर विधानसभेतील आमदारांनी एकच आवाज केला, त्यानंतर शिंदें म्हणाले की, अरे त्यामध्ये लपवायचं काय आहे, तुमच्याकडे टॉवर लोकेशन आहे, त्यामुळे माहिती पडलं. लगेच नाकाबंदी केली आयजीला सांगितलं नाकाबंदी करा. अरे पण मी पण कितीतरी वर्ष काम केलंय ना, मला पण नाकाबंदीतून कसं निघायचं असतं ते माहिती आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

भुजबळसाहेब जेव्हा बेळगावला गेले होते, तेव्हा वेश बदलून गेले होते. तिकडं गेल्यावर त्यांच्या लोकांनी तिकडच्या कर्नाटकच्या पोलीसांना मारलं. त्यानंतर आमची १०० लोकांची तुकडी गेली, त्यानंतर पोलिसांनी शिवसेनेचे लोक आहेत कळताच आम्हाला मारलं आणि डायरेक्ट बेल्लारी जेलमध्ये टाकलं. शंभर लोकांना ४० दिवस छगन भुजबळांमुळे जेलमध्ये टाकलं, असं एकनाथ शिंदेनी सांगितलं. भुजबळांना आधी जामीन मिळाला. पण आम्ही आतमध्ये होतो. भुजबळ यांनी इथं खूप मारामारी केलीय, त्यामुळे झालं असं की आम्ही जेलमध्ये होतो त्या ठिकाणी त्यांना रविवारी अंडी आणि नॉनव्हेज मिळत असे, ते त्यांनी बंद केलं. ४० दिवस आमचे हाल झाले, पण आम्ही डगमगलो नाही, आम्ही आमचं काम केलं.  नंतर धर्मवीर आनंद दिघे यांनी प्रत्येकी १ लाख रुपयांचा जामीन मिळवून दिला. तेव्हा कुठे काय इतका पैसा होता. १०० जणांचे १ कोटी इतके झाले, असे देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. हे जे झालं यामागे हिंदुत्वाचा विचार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

टॅग्स :एकनाथ शिंदेछगन भुजबळ