पालिकेच्या पाणी कपातीमुळे मुंबई विद्यापीठात पाणीटंचाईचे चटके आणखी तीव्र
By रेश्मा शिवडेकर | Published: June 5, 2024 09:13 PM2024-06-05T21:13:34+5:302024-06-05T21:13:53+5:30
बुधवारी विद्यार्थी वसतीगृहात पुरेसे पाणी नसल्याने विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली. वसतीगृहातील पाण्याच्या एका कुलरमध्येच काय ते पाणी होते
मुंबई - मुंबई महापालिकेने बुधवारपासून १० टक्के पाणीकपातीला सुरूवात केल्याने मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलाला गेली काही वर्षे बसत असलेले पाणी टंचाईचे चटके आणखी तीव्र आहेत. पाणी पुरवठ्यात आणखी कपात झाल्याने बुधवारी येथील विद्यार्थी वसतिगृहात पिण्याचे पाणीच नव्हते. विद्यार्थ्यांनी बोंबाबोंब केल्यानंतर पाण्याचे टँकर मागविण्यात आले.
अनेक तांत्रिक कारणांमुळे विद्यापीठात दररोजच्या गरजेच्या तुलनेत अवघे २९ टक्के इतकाच पाणीपुरवठा महापालिकेकडून होत आहे. एकूण २४३ एकर परिसरात वसलेल्या विद्यापीठाच्या कलिना संकुलाची पाण्याची गरज दररोज तब्बल २०.७८ लाख लीटर आहे. परंतु, महापालिकेकडून अवघा ९ लाख लीटर पाण्याचा पुरवठा होतो. त्यात वाढत्या पाणीटंचाईमुळे पालिकेकडून पाणीपुरवठ्याचे तास कमी करण्यात आल्याने विद्यापीठात सर्वत्र पाणीटंचाई जाणवते आहे. विद्यापीठातील पाणीटंचाईमुळे उद्भवणाऱया प्रश्नांवर गेले काही दिवस लोकमत वृत्तमालिकेतून प्रकाश टाकत आहे.
बुधवारी विद्यार्थी वसतीगृहात पुरेसे पाणी नसल्याने विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली. वसतीगृहातील पाण्याच्या एका कुलरमध्येच काय ते पाणी होते. पुरेसे पाणी न आल्याने पाण्याच्या टाक्या रिकाम्या झाल्या होत्या. विद्यार्थ्यांनी आरडाओरड केल्यानंतर पाण्याचे टँकर मागवून टाक्या भरण्यात आल्या. मात्र पालिकेची पाणीकपात दररोज सुरूच राहणार आहे. पाणीपुरवठा वाढावा यासाठी इमारतींचा नवीन नळजोडणी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या ४ नवीन इमारतींसाठी पालिकेकडून नळजोडणीची परवानगी मिळाल्याने त्याचे काम प्रगतीपथावर आहे.