गुगलच्या ‘त्या’ ऑप्शनमुळे मुंबईकरांना लाखोंचा गंडा! सर्च इंजिनवर ‘सजेस्ट ॲण्ड एडिट’ पर्यायाचा युजर्सना फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 02:09 PM2023-07-31T14:09:01+5:302023-07-31T14:09:34+5:30

...याचाच फायदा ऑनलाइन ठगांनी घेतल्याने मुंबई, दिल्लीसह देशभरात फसवणुकीच्या प्रकारांनी डोके वर काढले आहे. गेल्या पाच महिन्यांत बनावट संकेतस्थळप्रकरणी ५१ गुन्हे मुंबई पोलिसांच्या दफ्तरी नोंद झाले आहेत.  

Due to Google's that option, Mumbaikars have lost millions Users hit the 'Suggest and Edit' option on the search engine | गुगलच्या ‘त्या’ ऑप्शनमुळे मुंबईकरांना लाखोंचा गंडा! सर्च इंजिनवर ‘सजेस्ट ॲण्ड एडिट’ पर्यायाचा युजर्सना फटका

गुगलच्या ‘त्या’ ऑप्शनमुळे मुंबईकरांना लाखोंचा गंडा! सर्च इंजिनवर ‘सजेस्ट ॲण्ड एडिट’ पर्यायाचा युजर्सना फटका

googlenewsNext

मुंबई : कुठल्याही माहितीच्या शोधासाठी सारेच जण आपसूकच गुगलच्या सर्च इंजिनवर पोहोचतात. मात्र, गेल्या काही महिन्यात याच सर्च इंजिनमुळे अनेकांचे खिसे रिकामे झाले आहेत. अचूक माहिती मिळावी या उद्देशाने खासगी, शासकीय आस्थापनांचे उपलब्ध तपशील बदलण्याचे अधिकार ‘गुगल’ या देशातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनने वापरकर्त्यांना दिले आहेत. याचाच फायदा ऑनलाइन ठगांनी घेतल्याने मुंबई, दिल्लीसह देशभरात फसवणुकीच्या प्रकारांनी डोके वर काढले आहे. गेल्या पाच महिन्यांत बनावट संकेतस्थळप्रकरणी ५१ गुन्हे मुंबई पोलिसांच्या दफ्तरी नोंद झाले आहेत.  

जवळची बँक शाखा, मोबाइल किंवा वीज बिल भरणा केंद्र, विविध सेवा पुरवठादार कंपन्यांचे सर्व्हिस सेंटर, ग्राहक तक्रार केंद्र, हॉटेल या आणि अशा प्रत्येक शासकीय, खासगी आस्थापनांचा पत्ता, संपर्क क्रमांक, अचूक दिशा दर्शविणाऱ्या नकाशासाठी गुगलचा उपयोग होतो. हे तपशील अचूक असावेत यासाठी गुगलने सजेस्ट ॲण्ड एडिट हा पर्याय दिला आहे. त्याद्वारे तपशील बदलता येतो. याचाच फायदा घेत ठगांकडून फसवणूक करण्यात येत आहे. 

गेल्या काही महिन्यांत या घटनांचे प्रमाण वाढत आहे. गेल्या वर्षभरात हा आकडा ४९ होता, तर २०२१ मध्ये ३७ होता. 

अशीही लूट...
  सायबर भामटे हे नामांकित वित्तीय संस्था व बँकांच्या नावाने बनावट वेबसाइट तयार त्यावर कर्जवाटपाबाबतचा तपशील टाकतात. ऑनलाइन कर्ज घेण्यासाठी गुगलवर सर्चिंग करणारी मंडळी अशा वेबसाइटला बळी पडतात. 
  अशा संकेतस्थळावरील संबंधित लिंकवर वैयक्तिक माहिती शेअर करताच, ठगांकडून कॉल येतो. कर्ज मंजूर होण्यासाठी प्रोसेसिंग फी भरण्यास सांगतात. फी भरताच, लवकरच पैसे खात्यात जमा होणार असल्याचे सांगून कॉल कट होतो. त्यानंतर ठग मंडळीही नॉट रिचेबल होतात. अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात येत आहे

अशी घ्या काळजी...
बँक खात्यासह डेबिट-क्रेडिट कार्डाचे तपशील कोणालाही देऊ नये. ऑनलाइन व्यवहारांसाठी ओटीपीची (वन टाइम पासवर्ड) विचारणा होते. ओटीपीशिवाय व्यवहार पूर्ण होत नाहीत. त्यामुळे मोबाइलवर ओटीपी क्रमांक दर्शविणारा लघू संदेश आल्यास त्यातील तपशील कोणालाही देऊ नये. गुगलद्वारे माहिती मिळवताना संबंधित आस्थापनेच्या अधिकृत संकेतस्थळाचा शोध घ्यावा. त्यावरून संपर्क क्रमांक किंवा अन्य तपशील घ्यावेत, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

समोसे पडले दीड लाखांना 
समोशांसाठी प्रसिद्ध असलेल्या सायनमधील एका हाॅटेलच्या नावाचा वापर करत बनावट वेबसाइट तयार करून सायबर ठगांनी दि. ९ जुलै रोजी केईएम रुग्णालयातील डाॅक्टरला एक लाख ४० हजार रुपयांना ऑनलाइन गंडा घातला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून भोईवाडा पोलिस तपास करत आहेत. 

अशी करतात फसवणूक
ऑनलाइन ठग हे सजेस्ट ॲण्ड एडिट हा पर्याय वापरून बँकांसह शासकीय, खासगी आस्थापनांचा अधिकृत संपर्क क्रमांक खोडून स्वत:चा मोबाइल क्रमांक गुगलवर देतात. 

त्यामुळे समोरून बोलणारी व्यक्ती बँक, ग्राहक सेवा केंद्रातील अधिकारी असे भासवून वापरकर्त्यांशी संवाद साधला जातो. 
पुढे बँकेने कार्ड ब्लॉक झाल्याची भीती घालून बँक खाते, डेबिट-क्रेडिट कार्डाच्या तपशीलची मागणी केली जाते. खातेदारांकडून माहिती मिळताच त्याआधारे ऑनलाइन ठग संबंधितांच्या खात्यातून परस्पर पैसे काढतात. 

Web Title: Due to Google's that option, Mumbaikars have lost millions Users hit the 'Suggest and Edit' option on the search engine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.