लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शहर उपनगरात विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या प्रक्षेपणासाठी सर्वत्र एलईडी स्क्रिनसाठी धावपळ झाल्याचे दिसून आले. क्रिकेटच्या चाहत्यांनी हा सामना एकत्र येऊन पाहावा यासाठी हाॅटेल, बार, रेस्टाॅरंट अन् गल्लोगल्ली, निवासी वसाहती, उद्यान आणि मैदानांमध्ये या सामन्याचे थेट प्रक्षेपण आयोजित केले होते, त्यात काही राजकीय पक्षांनीही या प्रक्षेपणाच्या स्पर्धेत उडी घेतल्याने ऐन रविवारी शहर उपनगरात एलईडी स्क्रीनचा तुटवडा दिसून आला.
थेट प्रक्षेपणाचा प्लॅन आठवड्याभरापूर्वी करणाऱ्या क्रिकेट चाहत्यांना या एलईडी स्क्रीन सहज उपलब्ध झाल्या. मात्र, शेवटच्या क्षणी या स्क्रीनची मागणी वाढल्याने अनेकांच्या पदरी मात्र निराशाच आल्याने अखेरीस टीव्हीवरच सामना पाहण्याची वेळ आली. उपांत्य फेरीनंतर त्वरित रविवारच्या सामन्यासाठी एलईडी स्क्रिनचे बुकिंग सुरू झाले, त्यामुळे रविवारी मुंबईत अनेक ठिकाणी मोठ मोठ्या एलईडी स्क्रीनवर क्रिकेटचा आनंद घेणारे मुंबईकर ठिकठिकाणी पाहायला मिळाले. अगदी रविवारच्या दिनक्रमाचा सर्व बेत रद्द करून मुंबईकरांना या सामन्याचा चढ-उताराचा आनंद घेतला.
आयत्या वेळेचे नियोजन पथ्यावर आयत्या वेळी एलईडी स्क्रिनची मागणी करणाऱ्यांना स्क्रिन उपलब्ध होत नसल्याचे काही निवासी वसाहती संकुलांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. स्क्रिनची मागणी करण्यासाठी उशीर लावल्याने हा क्रिकेट सामना मोठ्या स्क्रीनवर पाहता न आल्याने काही चिमुरड्यांचा उत्साह मावळला, मात्र तरीही टीव्ही सोसायटी हाॅलमध्ये लावून हा सामना एन्जाॅय केला.
मोठ्या प्रमाणात प्रथमच मागणी एलईडी स्क्रिन लावून घेण्यासाठी प्रयत्नशील असलेले संयोजक, आयोजक धावाधाव करत होते. मात्र, ७० ते ८० टक्क्यांहून अधिक स्क्रिनचे आधीच बुकिंग झाले होते. हाच स्क्रिन आता २५ ते ३० हजार रुपये भाड्याने घेतले गेले आहेत. अनेक ग्राहक वाढीव भाडे देण्यासही तयार होते, मात्र स्क्रिनचा तुटवडा होता. -विनोद दोशी, पुरवठादार