Join us

वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी पडतेय अपुरे; ‘अपर वैतरणा’वर मुंबईकरांची मदार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 11:37 AM

...तर ‘भातसा’, ‘अपर वैतरणा’वर मुंबईकरांची मदार

मुंबई : वाढते तापमान, जागतिकीकरण, शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढणारी गरज यामुळे मुंबईला होणारा पाणीपुरवठा अपुरा पडतो. यंदाही जून महिन्यात उशिरापर्यंत आलेल्या पावसामुळे मुंबईकरांना राखीव पाण्याची गरज भासू लागली. मुंबईत पाणीटंचाई उद्भवल्यास आणि आवश्यकता भासल्यास ‘भातसा’ आणि ‘अपर वैतरणा’ या दोन धरणांतील राज्य सरकारच्या राखीव साठ्यावर मुंबईकरांची मदार असते.  मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी राज्य सरकारच्या अखत्यारित असलेली ‘अपर वैतरणा’ आणि ‘भातसा’ ही मोठी धरणे आहेत. ‘अपर वैतरणा’त २ लाख २७ हजार ४७ दशलक्ष लिटर साठवण क्षमता आहे, तर ‘भातसा’ची साठवण क्षमता ही ७ लाख १७ हजार ३७ आहे. 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ‘अपर वैतरणा’, ‘मोडकसागर’, ‘तानसा’, ‘मध्य वैतरणा’, ‘भातसा’, ‘विहार’, ‘तुळशी’ या सात धरणांतून मुंबईकरांना पाणीपुरवठा होतो. सातही धरणांची साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर आहे. या सातही धरणांमधून दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. यापैकी ‘भातसा’ आणि ‘अपर वैतरणा’ ही धरणे राज्य सरकारच्या अखत्यारित येतात. 

पालिकेकडून पाणी नियोजन आवश्यकमुंबईतील पाणीसाठा पाहता त्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. जलवाहिन्यांमधून होणारी गळती रोखणे, नियोजन करून पाणी कपात करणे आणि पाण्याचा अपव्यय टाळणे आवश्यक असेल. निवासी इमारतींबरोबरच औद्योगिक वसाहतींनाही होणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपातीचे नियोजन पालिकेने करायला हवे, असे जल अभ्यासक सांगतात.

मुंबईत अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटल्याने गळती होऊन मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. गुंदवली-भांडुप संकुलादरम्यानच्या जलबोगद्याचे पाच महिन्यांपूर्वी नुकसान झाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले होते. 

...तर राखीव साठ्याची आवश्यकता नाहीमुंबईला रोज तीन हजार ८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. सातही धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर जलसाठा झाल्यास चिंता मिटते. एक ऑक्टोबरपर्यंत पूर्ण क्षमतेने धरणे भरली तर वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहतो. त्यामुळे यावर्षी ऑक्टोबरमध्ये जलसाठा किती असेल, त्यावर पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन अवलंबून असते.

टॅग्स :पाणीमुंबई