वेळ, जागेच्या अभावामुळे पापड, कुरड्या, विविध मसाल्यांची थेट बाजारातूनच होतेय खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 10:12 IST2025-04-21T10:12:30+5:302025-04-21T10:12:45+5:30

वाळवण बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालास जेवढा पैसा लागतो, तेवढ्या पेशांत विविध वाळवणाचे पदार्थ बाजारात आयते विकत मिळतात.

Due to lack of time and space, papads and various spices are being purchased directly from the market. | वेळ, जागेच्या अभावामुळे पापड, कुरड्या, विविध मसाल्यांची थेट बाजारातूनच होतेय खरेदी

वेळ, जागेच्या अभावामुळे पापड, कुरड्या, विविध मसाल्यांची थेट बाजारातूनच होतेय खरेदी

सचिन लुंगसे 

मुंबई - दैनंदिन घरगुती जबाबदाऱ्या पार पाडत घड्याळ्याच्या काट्यावर ऑफिस गाठणाऱ्या मुंबईतील नोकरदार महिला वेळेअभावी थेट बचत गट, मॉल अथवा किरणा दुकानांतून आयते पापड, मिरगुंडे, कुरडया, विविध मसाले आदी पदार्थ खरेदी करताना दिसत आहेत.

जेवणाच्या ताटातील मुख्य मेनूबरोबर डावी बाजू अथवा तोंडी लावण्यासाठी, तसेच विविध सणासुदीच्या, समारंभांच्या निमित्ताने कैरीसह विविध प्रकारची लोणची, चुंदा, चटण्या, उडीद, पोहे व साबुदाण्याचे पापड, कुरडया, मिरगुंडे, सांडगे, बटाट्याचा किस, वेफर्स आवडीने खाल्ले जातात. मात्र, वेळ, जागेच्या अभावामुळे मुंबईत महिलांना असे पदार्थ करणे अशक्य होत आहे; परंतु अशा पदार्थांच्या वाढत्या दरांमुळे काही महिला कोणते ना कोणते पदार्थ घरी बनवताना दिसतात.

२०० ग्रॅम ५० रुपये 
कुरड्या, पापड्या, पोह्याचे पापड, तांदळाचे पापड, उडदाचे पापड, कुळथाचे पापड २०० ग्रॅम ५० रुपये दराने मिळतात. सध्या ग्राहकांची या पदार्थांना मोठी मागणी असल्याचे लालबाग मार्केटमधील एका विक्रेत्याने सांगितले.

सोशल मीडियावर अनेक महिला पारंपरिक पाककृती शेअर करत आहेत. तर काही जणी वर्कशॉप्स घेण्यासह पापड, लोणची विक्रीचा व्यवसाय करत आहेत.
डॉ. रसिका वैद्य  

उन्हाळ्यात पापड, लोणची बनवण्याची लगबग सुरू असते. परंतु, त्यासाठी मनुष्यबळ, वेळ आणि मुख्य म्हणजे ते पदार्थ वाळवण्यासाठी लागणाऱ्या जागेचा मुंबईत अभाव आहे. त्यामुळे या गोष्टी विकत घेणे सोयीस्कर आहे. महिलांना उद्योगाची नवीन संधी उपलब्ध होत आहे. - समिधा नलावडे

महागाई खूप वाढली आहे. वाळवण बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालास जेवढा पैसा लागतो, तेवढ्या पेशांत विविध वाळवणाचे पदार्थ बाजारात आयते विकत मिळतात. मुंबईत वाळवण सुकवण्यासाठी जागाही नाही. शिवाय ते बनवण्याचे कष्टही वाचतात. त्यामुळे वाळवण विकत घेण्यावर अधिक भर असतो.
प्राजक्ता मोहिते 

गव्हाच्या कुरडया, शेवया, मिश्र डाळींचे तिखट सांडगे, पापड, केळीचे काप, वेफर्स बनवणे कठीण नाही. मात्र, वाळवण बनविल्यावर ते सुकत कुठे घालायचे, हा प्रश्न आहे. घरातील मंडळी जे आवडीने खातात, असे मोजकेच पदार्थ, मसाले मी आवर्जून बनवते.  - काजल पाटील 

Web Title: Due to lack of time and space, papads and various spices are being purchased directly from the market.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.