कमी साठ्यामुळे मुंबईकरांनो, आतापासूनच पाणी जपून वापरा, राखीव साठ्यावर असेल मदार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 10:32 AM2023-05-01T10:32:05+5:302023-05-01T10:32:25+5:30
मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, बिहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो.
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये कमी पाणीसाठा उपलब्ध राहिल्याने मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट घोंगावत आहे. यामुळे आवश्यकता भासल्यास भातसा आणि अप्पर वैतरणा या दोन धरणांतील राज्य सरकारच्या राखीव साठ्यावर मदार असेल. या पाणीसाठ्याच्या वापरासाठी मुंबई महापालिकेने राज्य सरकारकडे आवश्यक प्रस्ताव पाठविला असून, त्याच्या मंजुरीची मुंबई महापालिकेला प्रतीक्षा आहे. सध्या सात धरणांमध्ये २६ टक्के पाणी असून, दर १५ दिवसांनी त्याचा आढावा घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, बिहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत ऑक्टोबरपर्यंत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठा गरजेचा आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या जलअभियंता विभागाने राज्याला पुढील दोन महिन्यांसाठी पाणी नियोजनासंदर्भात आराखडा सादर केला आहे. यामध्ये पाण्याची सद्य:स्थिती काय आहे, मुंबईकरांना पाण्याची किती गरज आहे आणि किती गरज भागवता येणार आहे, पाणीकपातीची वेळ आली तर काय या सर्व बाबी या आराखड्यात सादर करण्यात आल्या आहेत.
पाऊस लांबला तर ....
सात धरणांमध्ये सध्याच्या घडीला ३ लाख ७१ हजार ९१६ दशलक्ष लिटर म्हणजेच २६ टक्के पाणीसाठा आहे. २०२२ मध्ये ४ लाख १६ हजार ३९१ म्हणजेच २९ टक्के पाणीसाठा होता. आता २६ टक्केच पाणीसाठा असला तरीही, तूर्त पाणीकपात करण्याचा विचार नसला तरी, जूनमध्ये पाऊस लांबल्यास, वापर अधिक वाढला तर पाणीकपातीचा विचार होऊ शकतो.
मुंबईकरांना जलवाहिनी फुटल्याने पाणीकपातीचा सामना सध्या करावा लागत आहे. आता धरणातील साठा पाहून मुंबईकरांनी पाणी जपूनच वापरायला हवे, असे आवाहन केले आहे.