Join us

महामार्गावर वरदान ठरताहेत ‘मृत्युंजय दूत’; दीड वर्षांत १,२४३ अपघातग्रस्तांना जीवदान

By नितीन जगताप | Published: December 28, 2022 5:22 AM

महामार्गांवर होणाऱ्या अपघातांमधील जखमींना मदत करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी नेमलेले ‘मृत्युंजय दूत’ देवदूत ठरत आहेत.

नितीन जगताप, लोकमत न्यूज नेटवर्क  

मुंबई: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर होणाऱ्या अपघातांत जखमींना तातडीने मदत उपलब्ध होत नाही. महामार्गांवर होणाऱ्या अपघातांमधील जखमींना मदत करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी नेमलेले ‘मृत्युंजय दूत’ देवदूत ठरत आहेत. मृत्युंजय दुतांनी गंभीर जखमींना तत्परतेने केलेल्या मदतीमुळे दीड वर्षांत १,२४३ प्रवशांचे प्राण वाचले आहेत. 

देशात महामार्गांवरील अपघातात दरवर्षी साधारणपणे दीड लाख नागरिकांचा मृत्यू होतो. त्यात वेळेवर उपचार न मिळाल्याने बळी जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. त्यामुळे राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील मॉल, पेट्रोल पंप, ढाबे, हॉटेल्समधील कर्मचारी, गावातील नागरिकांचा एक समूह तयार करून त्यांना अपघातानंतर मदत करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. खासगी, सरकारी हॉस्पिटलचे अधिकारी तसेच सामाजिक संस्थेच्या स्वयंसेवकांमार्फत या देवदुतांना जखमींवर प्रथमोपचार कसे करावेत, त्यांना कसे हाताळावे याचे प्रशिक्षण देण्यात आले  आहे. देवदूतांच्या प्रत्येक समूहाला स्ट्रेचर व प्राथमिक उपचारांसाठीचे साहित्यही देण्यात आले आहे. याशिवाय महामार्गांवरील हॉस्पिटलची नावे व त्यांचे संपर्क क्रमांक देवदूतांकडे असून, याचप्रमाणे १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका कुठे आहे याबाबतची अद्ययावत माहिती देवदूतांकडे  आहे. 

६८८ अपघातांमध्ये मदत 

राज्यात १ मार्च २०२१ पासून महामार्गावर  मृत्युंजय दूत कार्यरत आहेत. १ मार्च ते ३१ ऑक्टोबर २०२२  पर्यंत ५,३५३ महामार्ग मृत्युंजय दूत कार्यरत आहेत. ६८८ अपघातांमध्ये या मृत्युंजय दुतांनी अपघातग्रस्तांना मदत केली आहे. अपघातांतील  १,४३९ व्यक्तींना रुग्णालयात पोहोचविण्यात आले असून त्यापैकी १,२४३ जणांचा जीव वाचविण्यात यश आले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :मुंबईअपघातमहामार्ग