वाढत्या महागाईत आता कोथिंबीर जुडीची शंभरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 01:15 PM2023-09-26T13:15:00+5:302023-09-26T13:15:10+5:30
पावसामुळे आवक कमी झाल्याचा फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोथिंबिरीची फोडणी महागली असून गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोथिंबिरीच्या जुडीने शंभरी गाठली आहे. काही महिन्यांपूर्वी वाढत्या दरामुळे टोमॅटो चर्चेत होते, आता टोमॅटोनंतर कोथिंबिरीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. आवक कमी झाल्यामुळे दर वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
ठाणे शहरात रोज कमीत कमी २० च्या आसपास कोथिंबिरीच्या गाड्या येतात. रोजच्या जेवणात वापर होत असल्याने कोथिंबिरीची रोज खरेदी होत असते. कोथिंबिरीशिवाय जेवणाला चवच येत नसल्याने जेवणातील अविभाज्य घटक म्हणून कोथिंबिरीकडे पाहिले जाते.
काही दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात २० रुपयांना मिळणारी कोथिंबीर आता १०० रुपयांवर पोहोचली आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे कोथिंबीर खराब होत आहे. परिणामी तिची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाल्याचे होलसेल विक्रेते भगवान तुपे यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.
महिलांसमोर पुन्हा पेच
नाशिक आणि पुण्यातून कोथिंबिरीची आवक होत आहे. होलसेल बाजारात ५० ते ६० रुपये जुडी, तर किरकोळ बाजारात १०० रुपये जुडीने कोथिंबीर विकली जात आहे. याआधी होलसेल बाजारात १० रू. जुडी तर किरकोळ बाजारात १५ ते २० रू जुडीने कोथिंबीर विकली जात होती. सणासुदीच्या काळात कोथिंबिरीचे दर वाढले असल्याने महिला वर्गाकडून नाराजी व्यक्त होत आहे.
चढ्या दराने विक्री
ठाणे शहरात कोपरी भाजी मार्केट, गावदेवी भाजी मार्केट तसेच, इतर किरकोळ बाजारात एका जुडीच्या पाच ते सहा छोट्या जुड्या करून ती कोथिंबीर २० रुपयांत विकली जात आहे. कोथिंबिरीचे दर काही दिवसांत खाली येतील. मात्र, ताेर्यंत चढ्या दरानेच नागरिकांना कोथिंबीर विकत घ्यावी लागणार आहे.