मुंबईतील वाढत्या तापमानामुळे आता रात्री रस्त्यांचे काँक्रिटीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 12:44 IST2025-03-15T12:44:39+5:302025-03-15T12:44:49+5:30
गुणवत्तेबाबत पालिकेकडून अभियंत्यांना विशेष सूचना; आयआयटीच्या कार्यशाळेत विचारमंथन

मुंबईतील वाढत्या तापमानामुळे आता रात्री रस्त्यांचे काँक्रिटीकरण
मुंबई : शहर, उपनगरांतील रस्ते काँक्रिटीकरणाची कामे येत्या तीन महिन्यांत अधिक गतीने राबविली जाणार आहेत. सध्या दिवसापेक्षा रात्रीचे तापमान कमी असल्याने त्यावेळी ही कामे केली जात आहेत. संबंधित विभाग अभियंत्यांनी या कामाच्या ठिकाणी उपस्थित राहणे बंधनकारक असून, गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करावे, अशी सूचना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
पालिकेचे वरिष्ठ अधिकारी, आयआयटी मुंबईची टीम, गुणवत्ता तपासणी संस्थेचे (क्यूएमए) प्रतिनिधी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाच्या ठिकाणी भेट देत निरीक्षणे नोंदवत आहेत. या निरीक्षणांवर चर्चेसह कामाची अत्युच्च गुणवत्ता, आव्हाने, अभियंत्यांच्या शंकांचे निरसन, या सर्व बाबींच्या अनुषंगाने पालिकेच्या रस्ते व वाहतूक विभागाच्या अभियंत्यांची विचारमंथन कार्यशाळा पवईतील आयआयटी येथे १३ मार्चला पार पडली. त्यावेळी बांगर यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
आयआयटी मुंबईचे उपसंचालक प्रा. डॉ. के. व्ही. कृष्णराव यांनी काँक्रीट रस्त्याचा आराखडा, तंत्रज्ञान, मुंबईतील तापमान आणि वाहनांची वर्दळ या अनुषंगाने माहिती दिली. त्यासाठी सुयोग्य तंत्रज्ञान, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण रस्त्यांसाठी पद्धती, चांगल्या प्रसारण सांध्यामुळे रस्त्याच्या आयुर्मानात होणारी वाढ आदींचा उहापोह केला.
प्रसरण सांध्यांमधील भेगा, सांध्यातील जास्त अंतर, हलकी आणि जड वाहतूक लक्षात घेता कोणत्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करावी, या विषयावरही त्यांनी मार्गदर्शन केले. रस्त्याचा टिकाऊपणा आणि तडे पडण्यास प्रतिबंध करण्यासाठी योग्य ठिकाणी आणि योग्यवेळी जॉइंट कटिंग केल्यास काँक्रीटमधील तडे नियंत्रित करता येतात आणि रस्त्याचे आयुष्य वाढते. काँक्रीट सेट झाल्यानंतर ठरावीक वेळेत संयंत्राद्वारे हे जॉइंट्स कट करावेत, असेही कृष्णराव यांनी उदाहरणासह स्पष्ट केले.
‘गुणवत्तेवर भर देण्याची गरज’
पेव्हमेंट क्वालिटी काँक्रीटचे योग्य ‘टेक्स्चरिंग’ केल्याने वाहनांची चाके चांगली पकड घेतात, रस्त्यावरून पाणी निघून जाते आणि टिकाऊपणा वाढतो. काँक्रीट ठिसूळ होण्यापूर्वीच हे काम गरजेचे आहे. अडचणी किंवा चुका या गुणवत्ता नियंत्रणाअभावी येतात. त्यामुळे गुणवत्ता नियोजनासाठी विशेष प्रयत्न गरजेचे आहेत, असे कृष्णराव म्हणाले.
भेगांची कारणे आणि उपाययोजना
काँक्रीट रस्त्याच्या भेगांची कारणे आणि उपलब्ध उपाययोजना, या विषयावर प्रा. डॉ. सोलोमॉन देबर्ना यांनी मार्गदर्शन केले. रस्त्यावर कोणत्या पद्धतीच्या भेगा आहेत, ते पाहून कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करावा, त्या उपाययोजनाही त्यांनी सांगितल्या. सध्या काँक्रीट रस्त्यावरील भेगांसाठी उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानाची त्यांनी माहिती दिली.
काँक्रिटीकरणाच्या कामाचा दर्जा आणि गुणवत्ता महत्त्वाची आहे. आयआयटी मुंबईसारख्या संस्थेकडून अभियंत्यांसोबत विचारमंथन आणि त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे. कोणत्याही प्रकल्पाची अंमलबजावणी करताना त्यात तांत्रिकदृष्ट्या कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी अभियंत्यांनी दक्ष राहणे गरजेचे असते जेणेकरून अडचणी असल्यास त्या योग्यरीत्या सोडवता येतात - अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प)