जलवाहिनीवरील झाकण तुटल्याने विक्रोळीत झाली पाण्याची नासाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 11:42 AM2023-09-25T11:42:53+5:302023-09-25T11:43:55+5:30
विक्रोळी पश्चिमेकडील एल. बी. एस. मार्गावर शनिवारी सकाळपासून सुरू झालेली पाणी गळती थांबविण्यात मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेला रविवारी पहाटे यश आले.
मुंबई :
विक्रोळी पश्चिमेकडील एल. बी. एस. मार्गावर शनिवारी सकाळपासून सुरू झालेली पाणी गळती थांबविण्यात मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेला रविवारी पहाटे यश आले. ३०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या टोकावरील झाकण तुटल्याने ही गळती होत होती. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी सहायक अभियंता (देखभाल) पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पथकाने रात्रभर दुरुस्तीचे काम केले. तब्बल १५ तासांनंतर पहाटे साडेपाच वाजता गळती रोखण्यात पथकाला यश आले.
महापालिकेच्या एस विभागांतर्गत येणाऱ्या विक्रोळी पश्चिम येथील लालबहादूर शास्त्री मार्गालगत असलेल्या २४ इंच व्यासाच्या वाहिनीला गळती लागली.
हजारो लिटर पाणी वाहून जात असल्याने तातडीने या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सहायक अभियंता (देखभाल) यांच्यामार्फत हाती घेण्यात आले.
या पथकाच्या माध्यमातून हे काम हाती घेतल्याने ही जलवाहिनी तात्पुरती बंद करण्यात आली.
पाणीपुरवठ्यावर झाला परिणाम
६०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर पाण्याची गळती होत आहे, असे सुरूवातीला वाटत होते. मात्र, खोदकाम करून पाहिले असता ३०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या टोकावरील झाकण तुटल्याचे आढळले. ऐन सणाच्या दिवसात परिसरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला होता.
भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला आदी पश्चिम दिशेला असणाऱ्या भागात विशेषतः एल. बी. एस. मार्गालगतच्या वस्त्यांमधील पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता महापालिका जल अभियंता विभागाने ट्विटरच्या माध्यमातून वर्तविली.