विदर्भ, मराठवाडा पुरता गारठला, मुंबईला हुलकावणी; पारा आणखी घसरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 06:04 AM2023-01-09T06:04:52+5:302023-01-09T06:05:00+5:30
गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या प्रदूषणात पुन्हा एकदा वाढ झाली असून,थंडीचा कडाका कमी झाला आहे.
मुंबई : मुंबईसह राज्यभरात सद्य:स्थितीमध्ये किमान तापमान सरासरी असले तरी पुढील दोन दिवसात हवामानात होत असलेल्या बदलामुळे पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान खाली घसरणार असून,येथे येणाऱ्या थंडीच्या लाटेमुळे राज्यातील गारव्यात पुन्हा एकदा भरच पडणार आहे. तर गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या प्रदूषणात पुन्हा एकदा वाढ झाली असून,थंडीचा कडाका कमी झाला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संलग्न मराठवाडा तसेच बहुतांश विदर्भात तापमानात घट होईल. किमान तापमान १० ते १२ अंशाच्या आसपास खाली उतरेल. विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट राहील. पुणे, अहमदनगर, औरंगाबाद आणि जळगावसह लगतच्या जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.
प्रदूषणाचा कहर
मुंबईच्या पश्चिम उपनगरात बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामुळे काही प्रमाणात का होईना गारवा अनुभवास येतो. मात्र गेल्या तीन दिवसांपासून पश्चिम उपनगरासह पूर्व उपनगरातील गारवा कमी झाला आहे. १५ अंशावर असणारे मुंबईचे किमान तापमान २१ अंशावर दाखल झाले असून, प्रदूषणाने तर कहर केला आहे.
थंडीचा कडाका
गोंदिया ६.८ । नागपूर ८ । वर्धा ९.४
औरंगाबाद ९.४ । गडचिरोली ९.४
उस्मानाबाद १०.१ । चंद्रपूर १०.२
अमरावती १०.४ । यवतमाळ १०.७
अकोला ११ । जळगाव ११
बुलढाणा ११.५ । उदगीर ११.६
परभणी १२ । नांदेड १२.२
महाबळेश्वर १२.२ । नाशिक १३
बारामती १३.२ । पुणे १३.४
जालना १३.६ । सातारा १४.३
सोलापूर १४.८ । मालेगाव १४.८
माथेरान १६ । सांगली १६.२
कोल्हापूर १७.२ । मुंबई २१.२