मुंबई : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आर्द्रतेमध्ये होणारी वाढ, प्रदूषके आणि ढगाळ वातावरणामुळे मुंबईसह कोकणातील थंडी गायब होणार आहे. येथे बहुतांशी भागात हवामान ढगाळ नोंदविण्यात येईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला असून, राज्यभरात सर्वसाधारण हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकणात ३ ते ७ जानेवारी असे ५ दिवसच ढगाळ वातावरण असेल.
मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रातील कोकण व मध्य महाराष्ट्रातील व विदर्भातील जिल्ह्यात १ ते ७ जानेवारी दरम्यानच्या आठवड्यात फक्त काही ठिकाणीच किंचित ढगाळ वातावरण राहू शकते. या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात ढगाळ वातावरणासहित पावसाची शक्यता नाही.
संपूर्ण महाराष्ट्रात सध्याचे पहाटेचे किमान तापमान हे १६ व दुपारचे कमाल तापमान ३० असून १ ते ७ जानेवारी दरम्यान ते याच पातळीत राहील. ही दोन्हीही तापमाने दरवर्षी या काळात नेहमीसारखी जशी असतात तशीच सरासरी तापमानाच्या पातळीत असुन त्यात विशेष चढ - उतार सध्या तरी जाणवणार नाही. गेल्या पंधरवाड्यापासून संपूर्ण उत्तर भारतात सुरु असलेला धुक्याचा कहर अजूनही तेथे कायम असुन महाराष्ट्रावर त्या वातावरणाचा विशेष असा काहीही परिणाम जाणवणार नाही, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.