- प्रसाद महाडकर (प्रमुख, जीवनगाणी)
साधारणपणे १९९०-९१ च्या दरम्यान दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करणे सुरू झाले. वेगवेगळ्या सामाजिक संस्था आणि गाण्यांचे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या संयोजकांनी हे कार्यक्रम सुरू केले. पहाटे साडेपाच पावणेसहाच्या सुमारास उठून गाण्यांच्या कार्यक्रमाला जायचे. आपल्या आवडीची गाणी आवडत्या गायकाच्या तोंडून ऐकायची. एकमेकांना भेटायचे. फोटो काढायचे असे आयोजन सुरू झाले. या कार्यक्रमांना मिळणारा प्रतिसाद पाहून राजकारणी नेते आणि पक्ष याकडे वळाले नसते तर नवल..! त्या त्या मतदारसंघातील राजकारण्यांनी स्वतःच्या पक्षाचा आणि स्वतःचा प्रचार, प्रसार करण्यासाठी, मतदारांसोबत जवळीक निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमांचा उपयोग करायला सुरुवात केली.
साधारणपणे २००० किंवा २००२ पासून आम्ही जेव्हा कार्यक्रम सुरू केले तेव्हा काही नेत्यांनी प्रायोजकत्व घेताना काही तिकिटेही घेतली. उरलेली तिकिटे नाट्यगृहात विकून कार्यक्रम सादर होऊ लागले. त्याला मिळणारा प्रतिसाद खर्च भागवण्याइतका होता. कालांतराने राजकीय दिवाळी पहाट सुरू झाली आणि रसिक प्रेक्षकांना विनामूल्य प्रवेश सुरू झाले. त्यामुळे कार्यक्रमांचा झगमगाट वाढला. कलाकारांचे मानधनही वाढले. जाहिराती, रस्त्यावर बॅनर सुरू झाले. हळूहळू या कार्यक्रमांना प्रसिद्धी सोबत ग्लॅमरही आले. त्यातून काही बिल्डर्स, वेगवेगळ्या कंपन्या त्यांच्या ब्रँडिंगसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून या कार्यक्रमांचे आयोजन करू लागले.
या सगळ्यातून एक मात्र झाले. संगीत, जुनी मराठी गाणी, जुन्या गायक गायिकांचे, संगीतकारांचे किस्से लोकांसमोर येऊ लागले. कलाकारांना व्यासपीठ मिळाले. त्यांना नवी ओळख मिळाली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वादक, बॅकस्टेजची मंडळी आणि सादरीकरण करणारे कलाकार या सगळ्यांना काम मिळाले. तेही आपली संस्कृती आणि कला सादर करून. मात्र, यावर्षी विधानसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय दिवाळी पहाट कुठेच आयोजित होऊ शकली नाही.
दिवाळी पहाटचा साधेपणाने एक कार्यक्रम करायचा तर ३ लाखापर्यंत खर्च येतो. त्यातही मोठ्या नाट्यगृहात, बड्या कलावंतांसह कार्यक्रम करायचा तर तो खर्च किमान ७ ते १० लाखांपर्यंत जातो. खुल्या मैदानात कार्यक्रम करायचा तर किती मोठे मैदान आणि किती लोकांच्या बसण्याची व्यवस्था यावर खर्चाचे गणित ठरते. नाट्यगृहाचे भाडे, कलाकारांचे मानधन, ध्वनी, प्रकाश, डेकोरेट्स, जनरेटर, फ्लेक्स प्रिंटिंग, डिझायनिंग, कॅन्टीन, अल्पोपहार, भेटवस्तू, कंदील, संयोजन, संहिता लेखन, भाडेकरारावर घ्याव्या लागणाऱ्या गाड्या, अशा अनेक गोष्टींचा समावेश त्यात होतो. माझ्या माहितीप्रमाणे मुंबईत छोटे-मोठे कार्यक्रम धरून दिवाळीच्या दिवसात किमान २०० च्या वर कार्यक्रम आयोजित केले जातात. महाराष्ट्रात ही संख्या २ हजार कार्यक्रमांच्या घरात आहे. सरासरी पाच लाख रुपये खर्च धरला तर २००० कार्यक्रमांचा किती हिशोब होतो आहे तुम्हीच बघा. मात्र यात संयोजकांना आयोजनापुरते पैसे मिळतात. बाकी सगळे पैसे वेगवेगळ्या ठिकाणी खर्च भागवण्यात जातात.
या वर्षी म्हणावे तसे कार्यक्रम झाले नाहीत. तरीही ही परंपरा खंडित होऊ नये म्हणून काही कार्पोरेट ऑफिसेस, बिल्डर्स यांनी पुढाकार घेऊन दिवाळी पहाटचे आयोजन केले. पण, त्याला गेल्यावर्षीची सर नव्हती. काही कलावंतांनी तिकीट लावून कार्यक्रम केले. त्याचे फायदे तोटे त्यांच्याजवळ... मात्र रसिक प्रेक्षकांना मोफत दिवाळी पहाटचे कार्यक्रम यंदा म्हणावे तसे पाहता, ऐकता आले नाहीत. ही कसर पुढच्या वर्षी भरून काढता येईल.