मरगळलेल्या ‘मरे’ची कूर्मगती; डबा घसरल्याचे कारण, प्रवाशांना घरी पोहोचायला उजाडली पहाट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 06:17 AM2024-10-20T06:17:00+5:302024-10-20T06:17:30+5:30
Central Railway Mumbai Local: कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांना पहाटेचे साडेतीन-चार वाजले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंब्रा ते डोंबिवली हे अंतर फार तर १५ मिनिटांचे. मात्र, शुक्रवारी रात्री हेच अंतर कापायला लोकलला तब्बल दोन ते अडीच तास लागत होते. निमित्त होते कल्याण स्थानकात लोकलचा डबा घसरल्याचे. या डबा घसरणीच्या घटनेमुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रकच घसरले आणि त्याचा परिणाम प्रवाशांना भोगावा लागला. कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांना पहाटेचे साडेतीन-चार वाजले होते.
कल्याण स्थानकात शुक्रवारी रात्री फलाट क्रमांक दोनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे निघालेल्या लोकलचा शेवटचा डबा रुळांवरून घसरला. त्यानंतर डाऊन मार्गावरील लोकलचे वेळापत्रक घसरले. त्यामुळे कामावरून घरी जाणाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत लोकलमध्ये बसून राहावे लागले. कल्याण स्थानकातील दुर्घटनेमुळे वाहतूक शुक्रवारी रात्री मंदावली. विशेषत: ठाण्यापुढील वाहतूक अक्षरश: कूर्मगतीने सुरू होती.
दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे या स्थानकांत रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची गर्दी होती. तेच चित्र लोकलच्या डब्यांमध्येही होते. खच्चून भरलेल्या गाड्या मुंब्रा ते डोंबिवली हे अंतर पार करायला दोन ते अडीच तास घेत होत्या. जलद मार्गावरील वाहतुकीलाही याचा फटका बसला. शनिवारी सकाळीही अप दिशेकडील वाहतूक सुरळीत झाली नव्हती. दिवसभर मध्य रेल्वेच्या लोकल अर्धा तास उशिरानेच धावत होत्या.
सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस
मध्य रेल्वे आणि खोळंबा हे समीकरण मुंबईकरांसाठी एकच झाले आहे अशी प्रतिक्रिया फेसबुकवर अनेक प्रवासी टाकताना दिसत होते. त्याचबरोबर ट्विटरवर प्रवाशांनी मध्य रेल्वेला टॅग करत वेगवेगळ्या स्टेशनवरील गर्दीचे फोटो टाकले होते. त्याचबरोबर व्हॉट्सॲपच्या ग्रुपवरून मुंबईकरांनी आपापल्या ठिकाणच्या स्टेशनचे अपडेट देत एकमेकांना मदत करण्याचे धोरण अवलंबले होते. काही प्रवासी विविध फिल्मी गाण्यांचे रील टाकत या गोंधळावर व्यक्त होत होते.
दिवा ते डोंबिवली हा प्रवास १५ मिनिटांत पूर्ण होतो. मात्र कल्याण स्थानकातील घटनेमुळे
हे अंतर कापण्यासाठी अडीच तास लागले. मुंबईतल्या सर्वच रेल्वे स्थानकांवर रात्री उशिरापर्यंत गर्दी होती. कोणतीच लोकल वेळेवर येत नव्हती. ज्या लोकल वेळेवर येत होत्या; त्यात पाय ठेवायला जागा नव्हती. शनिवारी सकाळीही अप दिशेकडील लोकलचे चित्र फार काही आशादायी नव्हती.
- संदीप पटाडे, प्रवासी, घाटकोपर
काल विभागीय व्यवस्थापक, मुंबई (डीआरएम) यांनी सोशल मीडियावर सुरुवातीला तांत्रिक कारणांमुळे रेल्वे सेवा उशिराने धावत आहेत, असे सांगितले. त्यानंतर समाज माध्यमांवर सर्व माहिती प्रसारित झाल्यानंतर एका तासाने अधिकृतरित्या रेल्वे रुळांवरून घसरल्याचे सांगितले. यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला. अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत.
- अक्षय महापदी, सचिव, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती