Mumbai: पाठपुराव्यामुळे गोरेगावातील विकासकामे लवकर मार्गी लागणार! सुभाष देसाई यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
By मनोहर कुंभेजकर | Published: March 1, 2023 07:51 PM2023-03-01T19:51:25+5:302023-03-01T19:52:52+5:30
Subhash Desai: धिम्या गतीने सुरु असलेल्या टोपीवाला मंडई व नाट्यगृहाचे इमारत बांधकाम वेगाने पूर्ण करावे असे निर्देश आयुक्तांनी संबंधित विभागाला दिले.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - शिवसेना नेते व माजी मंत्री सुभाष देसाई यांनी आज मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांची पालिका मुख्यालयात गोरेगाव विभागातील नागरी सुविधांच्या कामांना गती देण्यासाठी भेट घेतली.
धिम्या गतीने सुरु असलेल्या टोपीवाला मंडई व नाट्यगृहाचे इमारत बांधकाम वेगाने पूर्ण करावे असे निर्देश आयुक्तांनी संबंधित विभागाला दिले. त्याचप्रमाणे इमारत जीर्ण झाल्यामुळे पाडून टाकलेल्या सिद्धार्थ रुग्णालय इमारतीच्या जागी निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे नवीन इमारतीची उभारणी पुढील पंधरा दिवसांत सुरु करण्याचे संबंधित विभागाने मान्य केले.
गोरेगावातील लिंक रोड ओलांडणे प्रचंड वाहतुकीमुळे नागरिकांना दुरापास्त होत असल्यामुळे सरकत्या जिन्यांसह पाच ठिकाणी पादचारी पूल बांधण्याच्या कामास सुरुवात करावी असी सूचना आयुक्तांनी दिली. भगतसिंह नगर, लक्ष्मीनगर, बांगूर नगर, इनऑर्बिट मॉल व चिंचोली नाका येथे हे ५ पादचारी पूल प्रस्तावित आहेत.
मुंबई शहरातील महापालिकेच्या शालेय इमारती खाजगी शिक्षण संस्थांना शाळा चालविण्यासाठी दिलेल्या असून त्यापैकी अनेक इमारती मोडकळीला आलेल्या असून त्यांची पुनर्बांधणी होणे गरजेचे झाले आहे. यासाठी महापालिकेने धोरण तयार करावे अशी मागणी सुभाष देसाई यांनी केली असता त्यावर बैठकीत सकारात्मक कार्यवाही करण्याचे ठरले.
पश्चिम द्रुतगती मार्गाला समांतर असा प्रस्तावित सेवा मार्ग काही जागी पूर्ण तर काही जागी अपूर्ण राहिला असल्यामुळे वाहतुकीसाठी निरुपयोगी ठरत आहे. तो संपूर्ण करावा अशा आयुक्तांनी सुचना केल्या. एकंदरीत शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे गोरेगावातील विकासकामे लवकर पूर्ण होणार असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. या बैठकीला माजी नगरसेवक स्वप्निल टेम्बवलकर व शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर तसेच पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.