लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आझाद मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा होत असल्याने इथे दरवर्षी होणाऱ्या रावणदहनाची जागा बदलण्यात आली आहे. तसेच आझाद मैदानावर आयोजित रामलीलाचा कार्यक्रमही एक दिवस आधी संपवला जाणार आहे. आझाद मैदानात दरवर्षी दोन रामलीला होतात. यात महाराष्ट्र रामलीला मंडळ आणि साहित्य कला मंच यांच्या रामलीलांचा समावेश आहे.
२४ ऑक्टोबरला दसरा असल्याने या दिवशी मेळावा आयोजित करण्यासाठी आणि पूर्वतयारीसाठी आझाद मैदान २३ ऑक्टोबर रोजी रिकामे करण्याची विनंती शिंदे गटाने आयोजकांना केली होती. तसेच दसऱ्याच्या दिवशी आझाद मैदानावर होणारे रावणदहन चर्चगेट स्टेशनजवळील कर्नाटक मैदानावर घेण्याची विनंतीही केली होती. त्यानुसार रामलीला एक दिवस आधी संपवण्याचे मान्य केल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी साहित्य कला मंचाचा रावणदहनाचा कार्यक्रम कर्नाटक मैदानात हलवण्यात आला आहे. तर श्री महाराष्ट्र रामलीला मंडळाची रामलीला एक दिवस आधी संपविण्यास सांगण्यात आले आहे. अशा प्रकारे श्रीरामाच्या कार्यक्रमात विघ्न आणणाऱ्यांना रामभक्त कधीही माफ करणार नाहीत. - आनंद दुबे, प्रवक्ते, ठाकरे गट
रामलीला एक दिवस आधी संपवायला सांगितलेले नाही आणि रावणदहनाचा कार्यक्रम कर्नाटक मैदानावर घेण्याचा निर्णय आयोजकांबरोबर सहमतीने झालेला आहे. त्यांच्यावर कोणताही दबाव टाकलेला नाही. - नरेश म्हस्के, प्रवक्ते, शिंदे गट