मुंबई: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेतून त्यांनी देशात एकता, समता आणि बंधुतेचा पाया घातल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या तत्वांवर मार्गक्रमण केल्यामुळेच देश आज प्रगतीपथावर आहे. राज्याचा कारभार देखील त्यांचेच तत्त्व अंगीकारून सुरू असून सर्वांना समान न्याय देतानाच समाजातील गरीब, गरजू आणि शोषित वर्गाचे प्रश्न सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्याचा दर्जा वाढवा यासाठी महापरिनिर्वाण दिनाच्या एक दिवस आधीच शासनाच्या वतीने 'माझी शाळा सुंदर शाळा' या अभियानाला सुरुवात केली असल्याचेही यावेळी नमूद केले. डॉ. आंबेडकर यांचे भव्य असे स्मारक इंदू मिलच्या जागी उभारले जात असून हे काम वेळेत पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितले.