रेल्वे ब्लाॅकमुळे सुट्टीतही बेस्टचा ‘प्रवास’ भरधाव, प्रवासी संख्येत ३ टक्क्यांनी, तर उत्पन्नात १० टक्क्यांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 08:22 AM2024-06-04T08:22:16+5:302024-06-04T08:22:32+5:30
या दोन दिवसांत बेस्टला तीन कोटी ४७ लाखांचे उत्पन्न मिळाले. ते नेहमीच्या उत्पन्नापेक्षा १० टक्क्यांनी अधिक आहे.
मुंबई : मध्य रेल्वेच्या जम्बो ब्लॉकच्या कालावधीत १ जून रोजी बेस्ट बसमधून २७ लाख ३७ हजार ९७६, तर २ जून रोजी १९ लाख ६० हजार ५१२ मुंबईकरांनी प्रवासा केला. या दोन दिवसांत बेस्टला तीन कोटी ४७ लाखांचे उत्पन्न मिळाले. ते नेहमीच्या उत्पन्नापेक्षा १० टक्क्यांनी अधिक आहे.
एरव्ही दररोज बेस्टने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची संख्या ३२ ते ३३ लाख असते. मात्र, मेमध्ये सुटीमुळे प्रवासीसंख्या रोडावते; परंतु मध्य रेल्वेच्या ब्लॉक काळात बेस्ट बसच्या अतिरिक्त फेऱ्यांमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला.
ब्लॉक कालावधीत ९३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्टने तीन दिवस ५५ अतिरिक्त बस चालवण्याचा निर्णय घेतला. या जादा ५५ बसच्या ४८६ फेऱ्या चालवण्यात आल्या. त्यात वातानुकूलित दुमजली बसचाही समावेश होता.