कुलाबा, कोळीवाडा परिसरात उद्या ठणठणाट, जलवाहिनीची दुरुस्ती; पाणी जपून वापरा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 10:14 AM2024-05-10T10:14:33+5:302024-05-10T10:16:19+5:30
चर्चगेट येथील मंत्रालयाजवळ जीवन विमा मार्गावर मेट्रो ३ चे काम सुरू असताना १,२०० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे.
मुंबई : चर्चगेट येथील मंत्रालयाजवळ जीवन विमा मार्गावर मेट्रो ३ चे काम सुरू असताना १,२०० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे. या जलवाहिनीची दुरुस्ती शनिवार, ११ मे रोजी दुपारी ३:३० ते रात्री ११:३० दरम्यान केली जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत मुंबई महापालिकेकडून कुलाबा, कोळीवाडा आणि नौदल परिसरात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, तर नौदलास रात्री होणारा पुरवठा दुरुस्तीनंतर विलंबाने होणार आहे.
महापालिकेच्या 'ए' विभागात पाणीपुरवठा करण्यासाठी क्रॉस मैदान बोगद्यातून १,५०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीद्वारे पुढे १,२०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीचा उपयोग केला जातो. या जलवाहिनीवरून होणारा पुरवठा हा कमी दाबाने, तसेच कमी प्रमाणात होत असल्याने शोध घेण्यात आला. त्यावेळी ही गळती झाल्याचे निदर्शनास आले.
पालिकेच्या दुरुस्ती विभागाने घटनास्थळी पाहणी करून लवकरात लवकर जलवाहिनीची दुरुस्ती न केल्यास पाणी वाया जाण्यासह रस्ता खचण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली.
नौदल परिसराचा पाणीपुरवठा विलंबाने-
१) मंत्रालय व मरीन ड्राइव्ह हा परिसर अत्यंत महत्त्वाचा असल्याने पालिकेने मरीन ड्राइव्ह वाहतूक पोलिसांशी संपर्क साधून या दुरुस्तीच्या कामाचे प्राधान्य कळविले आहे. या कामासाठी सकाळी नऊ वाजल्यापासून खोदकाम सुरू केले जाईल.
२) जलवाहिनीतील पाणी उपसा करून नंतर प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम दुपारी ३:३० वाजल्यापासून केले जाईल.
३) कुलाबा, कोळीवाडा येथे शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर नौदलास रात्री १०:३० ते पहाटे २:५० या कालावधीत केला जाणारा नियमित पाणीपुरवठा हा दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर, जलवाहिन्या भारीत (चार्जिंग) करून त्यानंतर म्हणजेच पाणीपुरवठ्याच्या नेहमीच्या वेळेपेक्षा विलंबाने होणार आहे.