बाळासाहेबांच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांचा पाठींबा मिळतोय, मुख्यमंत्र्यांनी घेतले चांदीवलीच्या देवींचे दर्शन
By मनोहर कुंभेजकर | Published: September 29, 2022 06:21 PM2022-09-29T18:21:31+5:302022-09-29T18:22:06+5:30
हे सरकार सर्व सामान्य जनतेचे सरकार आहे लोकांना न्याय देऊन राज्याचा विकास करणे हे सरकारचे धोरण आहे
मुंबई -
हे सरकार सर्व सामान्य जनतेचे सरकार आहे लोकांना न्याय देऊन राज्याचा विकास करणे हे सरकारचे धोरण आहे आम्ही घेतलेली बाळासाहेबांची भूमिका लोकांनी मान्य केली आहे. बाळासाहेबांच्या बद्दलची भूमिकामुळे कार्यकर्ते आम्हाला पाठिंबा देत आहेत. चांदीवली विधानसभा मतदारसंघातले अनेक पदाधिकारी पक्षात सामील झाले आहेत. दसरा मेळावा जोरात होईल आणि लोकांना, जे राज्याला अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा जोरदार दसरा मेळावा होणार असल्याचा ठाम विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री चांदीवलीतील देवी दर्शनाच्या प्रसंगी व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या विविध नवरात्रोत्सव मंडळांना भेटी देत आहेत. या दरम्यान ठाकरे गटातून शिंदे गटात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचं इन्कमिंग सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी चांदिवली विधानसभा आमदार दिलीप लांडे यांच्या विधानसभा क्षेत्रमध्ये येऊन काजूपाडा आणि अन्य ठिकाणी असलेल्या नवरात्र उत्सव मंडळाना भेट दिल्या आणि तिथल्या देवीचे दर्शन घेतले. या दरम्यान चांदिवली विधानसभेतील शिवसेना शाखाप्रमुख , उपविभाग प्रमुख युवा सेना पदाधिकारी यांनी शिंदे गटात प्रवेश करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे समर्थन केले.
दरम्यान चांदिवली विधानसभेतील शिवसेना शाखा क्र. १६३ चे शाखाप्रमुख नितीन गोखले, शाखा क्र. १६२ चे शाखाप्रमुख शैलेश निंबाळकर, शाखा क्र. १६४ चे शाखाप्रमुख बाबू मोरे, शाखा संघटिका पार्वती शिंदे, श्वेता मसुरकर, युवासेना विधानसभा समन्वयक संजय जैन, उपविभाग अधिकारी अर्जुन गायकुडे, शाखा अधिकारी प्रणव गोळे, अजय कटके, शाखा समन्वयक राहुल कावळे यांच्यासह महिला व पुरुष उपशाखाप्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केला. तसेच अंधेरी पूर्व विधानसभेतील अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनीहि यावेळी शिंदे गटात प्रवेश केला.