Join us

शुश्रूषा रुग्णालयाची झाली विक्री; विक्रोळीकरांना  पर्यायी आरोग्य सेवा नाही

By जयंत होवाळ | Published: January 18, 2024 8:06 PM

सहकारी तत्वावरील या रुग्णालयात वाजवी दरात सेवा मिळेल अशी स्थानिकांची अपेक्षा होती. परंतु ती काही पूर्ण झाली नाही

मुंबई :  महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाच्या पुनर्विकासांतर्गत विक्रोळीकरांना १३  मजल्याचे सुसज्ज रुग्णालय मिळणार असले तरी नव्या  रुग्णालयाची उभारणी होईपर्यंत पर्यायी व्यवस्था मात्र मुंबई महापालिकेला करता आलेली नाही.  याच विभागातील बंद पडलेल्या  सहकारी तत्वावरील शुश्रूष रुग्णालयाचा पर्याय उपलब्ध करावा अशी स्थानिकांची मागणी  होती. मात्र आता याच रुग्णालयाची विक्री झाली आहे. त्यामुळे गरज भासल्यास  स्थानिकांना या रुग्णालयात खासगी दराने  उपचार घ्यावे लागतील.

म्हाडाने शुश्रूषा सिटिझन्स को-ऑपरेटिव्ह हॉस्पटिलस लिमिटेडला  प्रतिवर्षी १ रुपये भुईभाडे आकारून ३० वर्षांसाठी भूखंड दिला होता. सहकारी तत्वावरील या रुग्णालयासाठी १५०० सदस्यांनी नोंदणी  केली होती.  सुरुवातीचा काही काळ रुग्णालय व्यवस्थित चालले. प्रारंभीच्या काळात रुग्णालयाला निधीची चणचण जाणवत होती. त्यावेळी रमेश तुलसीयानी या गृहस्थांनी २५ कोटी रुपयांची देणगी दिली होती. त्यानंतर त्या रुग्णालयाला त्यांचे नाव देण्यात येऊन रमेश तुलसीयानी शुश्रूषा रुग्णालय असे रुग्णालयाचे नामकरण करण्यात आले.

सहकारी तत्वावरील या रुग्णालयात वाजवी दरात सेवा मिळेल अशी स्थानिकांची अपेक्षा होती. परंतु ती काही पूर्ण झाली नाही. त्यामुळे स्थानिकांनी या रुग्णालयाकडे  पाठ फिरवली.  निधीची अडचण, प्रशासकीय गलथानपणा, रुग्नांची  अपुरी संख्या या आणि इतर अनेक कारणांमुळे रुग्णालयाला घरघर लागली. हळूहळू रुग्णालय बंद पडू लागले. प्रशासकीय खर्च भागवण्यासाठी रुग्णालय चित्रीकरणासाठी दिले जाऊ लागले.  तरीही रुग्णालय उभारी घेत नव्हते. यथावकाश रुग्णालय बंद पडले.

बंद पडलेले हे रुग्णालय पालिकेने ताबयात घ्यावे आणि पालिकेच्या महात्मा फुले रुग्णालयाचा पुनर्विकास होईपर्यंत तिथे  पालिकेच्या दरात आरोग्य सेवा द्यावी, अशी मागणी होती. त्यादृष्टीने पालिका आणि शुश्रूषा  प्रशासनात  बैठकही झाली. पण  शुश्रुषाने  केलेल्या भाड्याची रक्कम देण्यास पालिकेने असमर्थता दर्शवली.  अखेर रुग्णालय विकण्याचा निर्णय घेण्यात आला. दत्ता    मेघे ट्रस्टला सुमारे ८० कोटींना रुग्णालय विकण्यात आले आहे. या ठिकाणी बहुधा  दोन आठवड्यात  नवे रुग्णालय सुरु होईल, परंतु तिथे खाजगी दरात उपचार मिळतील. त्यामुळे महात्मा फुले रुग्णालयास पर्याय म्हणून शुश्रूषा मिळावे ही अपेक्षा धुळीस मिळाली आहे. साहजिकच महात्मा फुले रुग्णालयाचा पुनर्विकास होईपर्यंत स्थनिकांना प्रतिक्षा  करावी लागणार आहे.