Join us  

राजकीय खिचडीमुळे उमेदवारी कोणाला?; राष्ट्रवादीतील फुटीने संभ्रमाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 10:07 AM

पालिकेत २२७ नगरसेवकांपैकी केवळ ९ नगरसेवक राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते. तर एक आमदार राष्ट्रवादीचा मुंबईत आहे.

मुंबई - राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्यानंतर मुंबईतील वातावरण ढवळून निघाले आहे. अजित पवारांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले आहेत. अजित पवारांनी थेट शिंदे - फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावर दावा केला आहे. असे असले तरी मुंबईत मात्र अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शरद पवार गटात असल्याचे चित्र आहे.

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद म्हणावी तशी नाही. पालिकेत २२७ नगरसेवकांपैकी केवळ ९ नगरसेवक राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते. तर एक आमदार राष्ट्रवादीचा मुंबईत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले. दोन गट निर्माण झाले असले तरी कार्यकर्त्यांचा ओढा शरद पवारांच्याच बाजूने असल्याचे दिसून येते. शरद पवार यांची नुकतीच मुंबईतील व्हाय. बी. सेंटर येथे बैठक झाली. या बैठकीत मुंबईतील कार्यकर्ते झाडून उपस्थित होते.

चुरस वाढेल

मुंबईतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते शरद पवार गटाकडून असले तरी आगामी पालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीमुळे शरद पवार गटात फाटाफूट होण्याची चिन्हे आहेत.

मुंबईतून निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा पाठिबा शरद पवार यांना असून सध्या तरी पक्ष बळकट करण्यावर तसेच पक्ष वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच संघटना आणखी मजबूत कशी होईल यावर भर दिला जाणार आहे. -राखी जाधव, कार्याध्यक्ष, मुंबई विभाग राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :अजित पवारशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस