मनाेज गडनीस, लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सोमवारी दुपारी मुंबईत आलेल्या धुळीच्या महाकाय वादळाचा मोठा फटका मुंबई विमानतळावरील वाहतुकीला बसला. प्रति तास ७५ किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे विमानतळ परिसरातील दृष्यमानात ३०० मीटरपेक्षा कमी झाली होती. त्यामुळे मुंबई विमानतळावरील वाहतूक ६६ मिनिटांसाठी स्थगित करण्यात आली होती.
सायंकाळी ५ वाजून ३ मिनिटांनी विमान वाहतुकीस सुरुवात झाली. मात्र, एक तासाच्या अवधीत विमानांचे उड्डाण व लँडिग न होऊ शकल्यामुळे वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडले. परिणामी विमान प्रवाशांना याचा मोठा फटका बसला. ज्यावेळी वादळ सुरू होते त्यावेळी ज्या विमानांची मुंबईत उतरण्याची वेळ होती अशा सुमारे २२ विमानांना अन्य विमानतळावर वळवण्यात आले. ही विमाने प्रामुख्याने गुजरातमध्ये बडोदा, अहमदाबाद, सुरत तसेच गोवा येथे वळवण्यात आली. दरम्यान, मुंबईत अचानक वादळ आणि पाऊस आल्यामुळे व त्यामुळे विमानतळ बंद केल्यामुळे प्रवाशांची चांगलीच दैना उडाली. विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना फारशी माहिती नव्हती.