बेस्टच्या कंत्राटी कामगारांच्या संपामुळे कोलमडली सेवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 09:24 AM2023-08-03T09:24:57+5:302023-08-03T09:25:47+5:30
बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी कामबंद आंदोलन पुकारले.
मुंबई
बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी कामबंद आंदोलन पुकारले. ५००हून अधिक कंत्राटी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते अचानक पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे मुलुंड घाटकोपर बस मार्गाचे वेळापत्रक कोलमडले असून, प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. दरम्यान, डागा या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली.
वेतनात वाढ करा, मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प विलीन करा व अन्य मागण्यांसाठी बुधवारी मुलुंड, घाटकोपर बस आगारातील कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले. १६० गाड्या आगारात उभ्या . राहिल्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी प्रवाशांना रिक्षा, टॅक्सी व कॅबचा आधार घ्यावा लागला. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमाने आपल्या ताफ्यातील अन्य गाड्या विविध मार्गांवर चालवल्या, मात्र, ही वाहने अपुरी पडल्याने अनेक गाड्यांमध्ये गर्दी पाहायला मिळत होती.
उत्पन्नावर परिणाम
>> पगार वाढीसाठी कंत्राटी चालकांनी याआधीही अनेकदा काम बंद आंदोलन केले. मात्र, आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते.
>> आधीच बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात बसगाड्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. त्यात बुधवारी मुलुंड व घाटकोपर बस आगारातील कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरु केल्यामुळे बेस्टच्या उत्पन्नावर परिणाम झाला.