बेस्ट वाहकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचे प्राण वाचले
By सीमा महांगडे | Published: December 10, 2023 10:24 PM2023-12-10T22:24:30+5:302023-12-10T22:25:49+5:30
प्रशिक्षणामुळे एका प्रवाशाचे प्राण वाचविण्यात आल्याची घटना घडली.
सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: रविवारी घाटकोपर आगारातून लोकमान्य नगर ठाण्याकडे जाणाऱ्या बेस्ट क्रमांक ७१७१ मध्ये बेस्ट वाहकाच्या सतर्कतेमुळे आणि त्यांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणामुळे एका प्रवाशाचे प्राण वाचविण्यात आल्याची घटना घडली.
४५३ क्रमांकाच्या बसमार्ग क्रमांकावरून, ठाण्याकडे जाणारी बस मुलुंड चेकनाक्याजवळ दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी रोहिदास पवार या ६२ वर्षीय प्रवाशाला चक्कर येऊन ते बेशुद्ध झाल्याची घटना घडली. त्यांना त्यावेळी हृदय विकाराचा झटका आल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली. दरम्यान प्रसंगावधान दाखवत सदर बसचे बस वाहक अर्जुन लाड यांनी पवार यांना प्राण वाचविण्यासाठी सीपीआर देऊ केला आणि त्यानंतर त्यांना उपचारासाठी ठाण्यातील इएसआयसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान आता पवार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे.
बेस्ट उपक्रमाकडून प्रशिक्षण
बेस्ट उपक्रमातील सर्व वाहकांना उपक्रमाकडून सीपीआर प्रशिक्षण देण्यात आले आहे. आपत्ती काळात किंवा संकटकाळी याचा वापर करून स्वतःचा व प्रवाशांचा जीव वाचविणे हे या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट आहे. दरम्यान याचाच वापर करत लाड यांनी प्रवाशाचे प्राण वाचविल्याची माहिती उपक्रमाकडून देण्यात आली.