मुंबई :बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात बेस्टच्या स्वमालकीच्या बसेसची संख्या तीन हजारांपर्यंत वाढवण्याचे नियोजन बेस्ट प्रशासनाचे आहे. मात्र, हे उद्दिष्ट अद्याप कागदावरच राहिले आहे. सध्या बेस्टच्या स्वमालकीच्या १०९६ बस असून, वयोमर्यादा संपुष्टात येत आहे. त्यामुळे पुढील तीन वर्षांत बेस्टच्या स्वमालकीच्या बस जुन्या झाल्याने इतिहासजमा होणार आहेत. भविष्यात बेस्ट उपक्रमात कंत्राटी पद्धत अवलंबली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नियोजनशून्य कारभार-
१) प्रवाशांची दुसरी लाइफलाइन म्हणून बेस्ट उपक्रमाची ओळख आहे. १० वर्षांपूर्वी बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात पाच हजार आणि ४५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करीत होते. राजकीय हस्तक्षेप आणि नियोजनशून्य प्रशासनाचा कारभार यामुळे दिवसेंदिवस बेस्ट उपक्रमास उतरती कळा लागली आहे.
२) आरामदायी व सुरक्षित प्रवास म्हणून आजही प्रवासी बेस्ट बसेसना पसंती देतात. त्यामुळे बेस्ट उपक्रम पुन्हा नव्याने मुंबईकरांना उपलब्ध होईल अशी अपेक्षा त्यांना आहे.
३) भाडेतत्त्वावरील बसेस ताफ्यात दाखल होत असताना बेस्टच्या स्वमालकीच्या बसेसचा ताफा ३,३३७ कायम ठेवणे बंधनकारक आहे.
नव्या बसची प्रतीक्षा, जुन्या गाड्या होणार इतिहासजमा-
प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या बेस्ट उपक्रमात इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस दाखल होत आहेत. मात्र, भाडेतत्त्वावरील बसेस ताफ्यात दाखल होत असताना बेस्टच्या स्वमालकीच्या बसेसचा ताफा ३,३३७ कायम ठेवणे बंधनकारक आहे. बेस्ट उपक्रमात कंत्राटी पद्धतीचा शिरकाव झाला आणि स्वमालकीच्या बसेस हळुवार इतिहासजमा होत आहेत. ताफ्यात स्वमालकीच्या बसेस आणण्याचे नियोजनही कागदावरच राहिले आहे.
बेस्टच्या ताफ्यातील स्वमालकीच्या बसेसची संख्या हळूहळू कमी होत आहे. २०२७ पर्यंत स्वमालकीच्या बसेस हद्दपार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात बेस्ट उपक्रमात कंत्राटी पद्धत राबवली जाण्याची शक्यता आहे.