Join us

पाऊस, दुर्घटनांनी वाहतुकीचे वाजले तीनतेरा; अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 9:58 AM

शहरात झाड पडल्याच्या एकूण १८७ घटना घडल्या असून, त्यातील १०४ पूर्व उपनगरात, ६७ पश्चिम उपनगरात तर शहरात १६ घटना घडल्या.

मुंबई : सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्याचे दिसून आले. शहरात झाड पडल्याच्या एकूण १८७ घटना घडल्या असून, त्यातील १०४ पूर्व उपनगरात, ६७ पश्चिम उपनगरात तर शहरात १६ घटना घडल्या. या घटनांमध्ये ५ जखमी तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, शहरातील विविध घटनांमुळे  पूर्व उपनगर, दादर, भायखळा, ट्रॉम्बे, वडाळा, जोगेश्वरी परिसरात वाहतूककोंडी झाली होती. घाटकोपर दुर्घटनेमुळे पूर्व उपनगरातून घाटकोपर व ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना एक ते दीड तास अधिक कालावधी लागत होता, तर वडाळा दुर्घटनेमुळे बरकत अली जंक्शन, पूजा जंक्शन येथील वडाळ्यावरून उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू होती. वडाळा पुलावरील वाहतूकही दुसऱ्या मार्गिकेवर वळविण्यात आली. ट्रॉम्बे येथील फ्रीवे टनल येथे अपघात झाला. त्यामुळे ट्रॉम्बे येथून दक्षिणेकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक प्रभावीत झाली होती. वाहनांंच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.    

दरम्यान, पावसाने जोगेश्वरी पूर्वेकडील मेघवाडी नाक्याजवळील शिवसेना शाखा क्र. ७७ जवळील उंच नारळाचे झाड रस्त्यावरील ऑटो रिक्षावर कोसळले. या घटनेत हयायत खान हे रिक्षा चालक गंभीर जखमी झाले. शिवसेना शाखेमधील शिवसैनिक केतन कोरगावकर आणि सुधीर चंद्रकांत राणे यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन रिक्षा चालक हयायत खान यांना जोगेश्वरीमधील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केल्याची माहिती देण्यात आली. याशिवाय पश्चिम उपनगरात काही ठिकाणी वाहने बंद पडल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. शिवाजी पार्क परिसरातही धुळीमुळे दुचाकीस्वारांची तारांबळ उडाली. 

टॅग्स :मुंबईपाऊसअपघात