मुंबई : जालना - सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मंगळवारी २ मेल-एक्स्प्रेस आणि एका लोकलचा खोळंबा झाला. बिघाड दुरुस्तीनंतर तासभर विलंबाने वंदे भारत रेल्वे मुंबईत दाखल झाली. यामुळे सकाळी लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागला.
मध्य रेल्वेच्या इगतपुरी-कल्याण विभागातील आसनगाव स्थानकात मंगळवारी सकाळी १०:३२ च्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर वंदे भारत दाखल झाली. यावेळी डब्याखाली धूर निघत असल्याची माहिती लोको पायलटला मिळाली. स्थानकातील रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांसह रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने गाडीची तपासणी केली. तेव्हा ब्रेक बायडिंगमुळे धूर निघत असल्याचे स्पष्ट झाले.
यामुळे तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. अर्ध्या तासानंतर सकाळी ११:०२ च्या सुमारास वंदे भारत रेल्वे मुंबईसाठी रवाना झाली. वंदे भारतमुळे मेल-एक्स्प्रेसलाही फटका बसला.