लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठाच्या चौथ्या सत्रातील अभियांत्रिकीच्या सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांचे निकाल रखडल्याने त्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. विद्यापीठाने त्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या सत्राचे पुनर्मूल्यांकन निकाल सात ते आठ महिन्यांच्या विलंबानंतर जाहीर केले आणि त्यांना अनुत्तीर्ण घोषित केले.
महत्वाचे म्हणजे, विद्यार्थी आगामी चौथ्या सत्राच्या परीक्षांची तयारी करत असताना लागलेल्या पुनर्मूल्यांकनाच्या निकालानंतर त्यांना हे कळविण्यात आले. त्यामुळे त्यांनी तिस-या आणि चौथ्या सत्राला वेळ आणि मेहनत व्यर्थ ठरली आहे. तसेच त्यांचे वर्षही वाया जान्याची भीती आहे.प्रकरण काय?चार वर्षांच्या इंजिनिअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमाला पहिल्या वर्षी प्रथम सत्राला पाच आणि द्वितीय सत्राला सहा विषय असतात. दुसऱया वर्षाचे प्रवेश निश्चित करायचे असल्यास या ११ पैकी सहा विषयांत उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. परंतु २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचा प्रवेश जुलैमध्ये न होता नोव्हेंबर २०२१ मध्ये झाला. यामुळे संपूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम अवघ्या सहा महिन्यात संपविण्यात आला. प्रत्येक सत्रात किमान ९० दिवसाचा शैक्षणिक कालावधी पूर्ण करणे आवश्यक असते. परंतु, प्रथम व द्वितीय अशी दोन्ही सत्रे तीन-तीन महिन्यांतच संपवण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांची तयारीच पुरेशी झालेली नाही. त्यात परिक्षांचे निकाल विद्यापीठ कायद्यानुसार ३० ते ४५ दिवसात लावणे बंधनकारक आहे. परंतु निकाल ११० दिवसांनंतर लावण्यात आला आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता योग्य तो वेळ न देता निकालानंतर लगेच ४ दिवसात परीक्षा घेण्यात आली. यामुळे या शैक्षणिक वर्षांत एटिकेटी विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त झाले. विद्यार्थ्यांना पाचहून अधिक विषयात एटीकेटी असल्यामुळे आणि विद्यार्थ्यांचा द्वितीय सत्राचा निकाल न लागल्यामुळे विद्यार्थ्यांनी दुसरया वर्षात प्रवेश घेतला. नियमानुसार तसा घेण्याची परवानगी नाही. विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क घेऊन विद्यार्थ्यांचा द्वितीय वर्षात प्रवेश तात्पुरत्या स्वरूपात निश्चित करण्यात आला होता.