Join us

शौचालय समस्येमुळे विक्रोळीकर त्रस्त

By admin | Published: September 10, 2014 1:47 AM

पुनर्विकासाच्या नावाखाली जमीनदोस्त करण्यात आलेल्या शौचालयामुळे प्रवाशांसह स्थानिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र विक्रोळीमध्ये पाहावयास मिळते.

विक्रोळी : पुनर्विकासाच्या नावाखाली जमीनदोस्त करण्यात आलेल्या शौचालयामुळे प्रवाशांसह स्थानिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र विक्रोळीमध्ये पाहावयास मिळत आहे. वर्ष उलटूनही या शौचालयाची बांधणी तर दूरच, पण तोडलेल्या शौचालयाचे डेब्रिजही उचलण्यास संबंधित प्रशासनास मुहूर्त मिळत नसल्याचे दिसून येते.विक्रोळी पूर्व स्टेशन परिसरालगत पालिकेचे सुसज्ज असे सार्वजनिक शौचालय होते. प्रवाशांबरोबर स्थानिकांनाही याचा फायदा होत होता. तसेच जवळच विक्रोळी पोलीस ठाण्याची बिट चौकी आहे. स्थानिक पोलीसही याच शौचालयाचा वापर करीत होते. अशात वर्षभरापूर्वी त्याच ठिकाणी नवीन शौचालय उभारण्यासाठी हे शौचालय तोडण्यात आले. त्यामुळे शौचालयाअभावी प्रवाशांसह स्थानिकांना समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यातही महिला आणि ज्येष्ठांना याचा नाहक फटका सहन करावा लागत आहे. पोलीस बिट चौकीतील महिला पोलिसांंची तर यामुळे फारच कोंडी होत आहे. बहुतेक वेळा शौचालयाच्या गैरसोयीमुळे बिट चौकीमध्ये महिला पोलीस वर्गाला थांबणे कठीण जात असल्याचे त्यांनी सांगितले. अशात शौचालयासाठी त्यांना एकतर स्टेशन परिसरातील शौचालयाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर शौचालयाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक ज्ञानदेव ससाणे यांनी केली आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते संपर्कात येऊ शकले नाहीत. (प्रतिनिधी)