Join us

वर्दीतील ‘दुर्गे’मुळे निर्मलनगरात टळली मोठी दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 6:26 AM

देवीच्या विसर्जन सोहळ्यावेळी फटाका ट्रकवर पडून आग लागण्याची घटना शुक्रवारी पश्चिम उपनगरातील निर्मलनगर परिसरात घडली.

मुंबई : देवीच्या विसर्जन सोहळ्यावेळी फटाका ट्रकवर पडून आग लागण्याची घटना शुक्रवारी पश्चिम उपनगरातील निर्मलनगर परिसरात घडली. मात्र त्या वेळी बंदोबस्तावर असलेल्या निर्मलनगरच्या पोलीस ठाण्याच्या महिला कॉन्स्टेबल बी. व्ही. सुतार यांनी प्रसंगावधान राखत शिताफीने पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.महिला कॉन्स्टेबल सुतार या शुक्रवारी विसर्जन मिरवणूक बंदोबस्तावर असताना खेरवाडीतील जयदुर्गा मित्र मंडळाची मिरवणूक संध्याकाळी सुरू होती. एक रथ, त्याच्यामागे ट्रक आणि त्यावर विराजमान झालेली देवीची लहान आणि मोठी मूर्ती अशी मिरवणूक वाजतगाजत निघाली. त्याच ट्रकवर एका बाजूला फटाके ठेवण्यात आले होते. एक मुलगा फटाके घेण्यासाठी आला मात्र दुसरा त्याला अडवत होता. त्यांच्या त्या खेचाखेचीत पेटलेला फटाका हातातून निसटून ट्रकवर असलेल्या देवीच्या ओढणीवर आणि सिंहाच्या आयाळीवर पडला. त्यामुळे आग लागली. क्षणार्धात आग पसरू लागल्याने सर्वांची पळापळ सुरू झाली. त्या वेळी महिला कॉन्स्टेबल सुतार यांनी धावत जाऊन परिसरातील एका मेडिकलमधून आग प्रतिबंधक यंत्र आणून आगीवर मारा केला. मात्र तरीही आग आटोक्यात येत नसल्याचे लक्षात येताच त्या पुन्हा एका दुकानात जाऊन तीस ते पस्तीस लीटरचा पाण्याचा कॅन खांद्यावरून उचलून घेऊन आल्या. तो डोक्यावर घेत ट्रकवर चढवित कार्यकर्त्यांना दिला. कार्यकर्त्यांनी पाण्याचा मारा करीत आग विझविली.सुतार यांच्या या प्रसंगावधानाचे मंडळ आणि निर्मलनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी तसेच वरिष्ठांनीदेखील कौतुक केले. सुतार यांचे वडील कृष्णा निवेंडकर हे भायखळा अग्निशमन दल कार्यशाळेत कार्यरत होते. त्यांच्यापासूनच मला समाजसेवेची प्रेरणा मिळाल्याचे सुतार यांनी सांगितले. त्यांचे पतीही मुंबई पोलीस दलात कार्यरत असून, ओशिवरा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.>प्रसंगावधान राखलेआग लागल्याचे लक्षात येताच सुतार यांनी प्रसंगावधान राखत दुकानात जाऊन तीस ते पस्तीस लीटरचा पाण्याचा कॅन खांद्यावरून उचलून घेऊन आल्या. तो डोक्यावर घेत ट्रकवर चढवित कार्यकर्त्यांना दिला. कार्यकर्त्यांनी पाण्याचा मारा करीत आग विझविली.