Join us

अवेळी पावसामुळे कमाल तापमानात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 6:07 AM

देशासह राज्याच्या वातावरणात विशेषत: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील वातावरणात प्रामुख्याने बदल होत आहे.

मुंबई : देशासह राज्याच्या वातावरणात विशेषत: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील वातावरणात प्रामुख्याने बदल होत आहे. वातावरणीय बदलामुळे येथे अवेळी पावसाची नोंद होत असून, पडलेल्या पावसामुळे कमाल तापमानात लक्षणीय घट झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे या भागातील अनेक शहरांचे कमाल तापमान ४४ अंश नोंदविण्यात येत होते. मात्र पावसामुळे कमाल तापमानात घट नोंदविण्यात आली असून, कमाल तापमान ४४ अंशावरून ४० अंशावर घसरले आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंद झाले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईचा विचार करता गेल्या तीनएक दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरातील वातावरण ढगाळ नोंदविण्यात येत आहे. विशेषत: सकाळी ११ आणि दुपारी ४ च्या सुमारास शहर आणि उपनगरावर मळभ दाटून येत आहे. मळभ दाटून येत असल्याने मुंबईकरांची उन्हापासून सुटका होत असली तरीदेखील वाढता उकाडा मुंबईकरांचा घाम काढत आहे.>राज्यासाठी अंदाज१९ ते २० एप्रिल : विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.२१ एप्रिल : मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान कोरडे राहील.२२ एप्रिल : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.मुंबईसाठी अंदाज : १९ आणि २१ एप्रिल : आकाश मुख्यत: निरभ्र राहील. सायंकाळसह रात्री अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, ३३ अंशाच्या आसपास राहील.