Join us

मेट्रोच्या कामांमुळे पाणी तुंबणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 5:27 AM

मेट्रो बसविणार २४१ पंप, २४ तास नियंत्रण कक्ष तैनात ठेवणार

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामामुळे पावसाळ्यात पाणी तुंबणार, या विधानामुळे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना राजकीय पक्षांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. मात्र, त्यांचा हा आरोप मुंबई महापालिका प्रशासनाने गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी महापालिका मुख्यालयात बुधवारी झालेल्या समन्वय बैठकीत, मेट्रो रेल्वे प्रशासनाने २४१ ठिकाणी पावसाचे पाणी उपसण्याचे पंप बसविण्याची हमी दिली आहे. महापालिका २९५ ठिकाणी पंप बसविणार आहे.त्यामुळे मुंबई पावसाळ्यात तुंबणार यावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे. मुंबईत आजच्या घडीला रस्त्यांच्या कामाव्यतिरिक्त मेट्रो रेल्वे व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचीही कामे सुरू आहेत. यामुळे काम सुरू असलेल्या परिसरात पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालयात झालेल्या समन्वय बैठकीत महापालिका आयुक्त अजय मेहता, एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव, मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे, अतिरिक्त पालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, पर्जन्य जलवाहिन्या खात्याचे प्रमुख अभियंता श्रीकांत कावळे, आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे प्रमुखअधिकारी महेश नार्वेकर आदी उपस्थित होते.या बैठकीत मेट्रोमार्फ त मुंबईत सुरू असलेल्या प्रकल्पाच्या ठिकाणी, तसेच पाणी तुंबण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी एकूण मेट्रो रेल्वेद्वारे २४१ पंप बसविण्याची हमी देण्यात आली, तसेच पावसाळ्यात ज्या ठिकाणी अडचणी उद्भवू शकतील, अशा ठिकाणी संबंधित तिन्ही यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी संयुक्त पाहणी दौरा व आवश्यक समन्वय साधतील, असा निर्णय घेण्यातआला.बऱ्याच वेळा समन्वयाअभावी पावसाळ्यात गैरसोय वाढत असल्याने, एमएमआरडीए व मेट्रो यांच्या स्तरावर समन्वय अधिकाºयांची (नोडल आॅफीसर) यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. त्याचबरोबर, महापालिकेप्रमाणेच या दोन्ही प्राधिकरणातही २४ तास नियंत्रण कक्ष तैनात ठेवण्यात येणार आहे.पहारेकरी तोंडघशीमेट्रो रेल्वेच्या कामांमुळे मुंबईत पाणी तुंबणार नाही, असा दावा भाजपा नेते करीत आहेत. मात्र, महापालिका मुख्यालयात बुधवारी झालेल्या समन्वय बैठकीत मेट्रो रेल्वेने मुंबईत त्यांचे प्रकल्प सुरू असलेल्या ठिकाणी २४१ पंप बसविण्याची तयारी दाखवून, एकप्रकारे मेट्रोच्या कामामुळे मुंबई तुंबणार हे कबूल केले आहे, असे म्हटले जात आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामामुळे मुंबई तुंबणार नाही, असा दावा करणारे तोंडघशी पडले असल्याचा टोला, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपाला लगावला आहे.२४ तास नियंत्रण कक्षमहापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ यांच्या स्तरावरदेखील आठवड्याचे सातही दिवस व दिवसाचे २४ तास कार्यरत राहणारा नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे.५३६ ठिकाणी पंप : मुंबई महापालिका मुंबईत २९५ ठिकाणी पावसाचे पाणी उपसण्यासाठी पंप बसविणार आहे. त्यात आता मेट्रो रेल्वेही २४१ ठिकाणी पंप बसविणार आहे. म्हणजेच मुंबईत यंदाच्या पावसाळ्यात तब्ब्ल ५३६ ठिकाणी पंप बसविले जाणार आहेत. याचाच अर्थ, या ठिकाणी पाणी तुंबणार नाही, याची शाश्वती महापालिकेला नाही, असे दिसून येत आहे. ज्या ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत व ज्या ठिकाणी पाणी साचू शकते, अशा ठिकाणी हे पंप बसविण्यात येणार आहेत.असा होता वादगेल्या आठवड्यात पश्चिम उपनगरातील नालेसफाईच्या कामाची पाहणी करणाºया महापौरांनी मेट्रोच्या कामामुळे मुंबई तुंबणार, असा आरोप केला होता.त्यांच्या या विधानामुळे भाजपाने त्यांच्यावर टीकेची झोड उठवत सन २००० मध्ये मेट्रो होती का? तेव्हा पाणी का तुंबले, असे अनेक सवाल केले होते.तर राज्य सरकारला जबाबदार धरून शिवसेनेला आपली जबाबदारी झटकता येणार नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसने लगावला होता.मेट्रोला केलेल्या सूचनाआत्तापर्यंत मेट्रो रेल्वे प्रशासन पावसाळापूर्व कामाची जबाबदारी झटकत असल्याचे चित्र होते. मात्र, बुधवारी झालेल्या बैठकीत मेट्रो रेल्वे प्रशासनाने बºयाच कामांची जबाबदारी स्वीकारून पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याची हमी दिली आहे. मुंबई सेंट्रल, कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक येथे मेट्रो स्टेशनच्या कामांसाठी पर्जन्य जलवाहिन्या वळविण्याचे काम ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे.पश्चिम द्रुतगती महामार्गावरील, दहिसर ते अंधेरी दरम्यानच्या लिंक रोडवरील मेट्रो खांबांच्या भोवताली पाणी साचणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना एमएमआरडीए व दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाला करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :मुंबईमेट्रो