Join us

मेट्रोच्या कामामुळे भांडुपमध्ये जलवाहिनीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 1:03 AM

भांडुप एलबीएस मार्गावरील मेट्रो मॉलसमोरील जमिनीच्या खालून जाणाऱ्या जलवाहिनीवर दाब आल्याने सकाळी गळती सुरू झाली.

मुंबई : भांडुप येथील लाल बहादूर शास्त्री मार्गालगत असलेल्या जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. गुरुवारी सकाळी मेट्रो मॉलसमोरील २४ इंची व्यासाच्या जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे एलबीएसच्या दोन्ही बाजूंस पाणी साचले होते. मुंबई शहर व उपनगरातील अनेक रस्त्यांवर मेट्रोचे काम सुरू आहे. या कामांमुळे अनेकदा भूमिगत जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडत आहेत. भांडुप एलबीएस मार्गावरील मेट्रो मॉलसमोरील जमिनीच्या खालून जाणाऱ्या जलवाहिनीवर दाब आल्याने सकाळी गळती सुरू झाली. या घटनेमुळे भांडुप पश्चिम दिशेकडे जाणाºया वाहिनीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. परिणामी, खिंडीपाडा, टेंभीपाडा, भांडुप गाव व मंगतराम पेट्रोल पंप परिसरामध्ये गुरुवारी पाणीपुरवठा खंडित झाला होता. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असून पाणीपुरवठा सुरळीत होण्यास विलंब होईल, असे एस विभाग कार्यालयाने सांगितले़