Join us

महिलेवर कोयत्याने वार करत लुटणाऱ्या दुकलीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 4:35 AM

गुन्हे शाखेची कारवाईगुन्हे शाखेची कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महिलेच्या गळ्यावर कोयत्याने वार करत त्यांना लुटणाऱ्या ...

गुन्हे शाखेची कारवाई

गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महिलेच्या गळ्यावर कोयत्याने वार करत त्यांना लुटणाऱ्या दुकलीला गुन्हे शाखेच्या कक्ष ६ ने बेडया ठोकल्या आहेत. अख्तर रजा अन्वर इद्रीसी उर्फ जाॅंटी आणि अब्दुल अजीम रहमत खान उर्फ अजून रायडर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत एकूण १६ गुन्हे दाखल आहेत.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, २४ जानेवारी रोजी तक्रारदार हे पत्नीसोबत चेंबूरच्या पाटील मार्गावरून जात असताना, अँक्टिवावरून आलेल्या दुकलीने त्यांच्या पत्नीवर कोयत्याने वार करून तिच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र घेऊन पळ काढला. याप्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला. गुन्हे शाखेच्या कक्ष ६नेही याचा समांतर तपास सुरू केला.

पोलीस उपायुक्त अकबर पठाण, सहायक पोलीस आयुक्त सिद्धार्थ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक सुहास चौधरी यांच्या पथकाने शिवाजी नगर, गोवंडी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींचा शोध घेणे सुरु केले. अखेर, तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर ही दुकली त्यांच्या हाती लागली. याप्रकरणी अटक केलेले आरोपी गोवंडीचे रहिवासी आहेत.

त्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, १८ जानेवारी रोजी रात्री तीन वाजता चोरीच्या उद्देशाने नौपाडा परिसरात फिरत असताना, नाशिक-मुंबई महामार्गावर एक मुलगा दुचाकी चालवताना दिसून आला. त्याला मारहाण करत त्याची दुचाकी घेत आरोपींनी पळ काढला. त्याच दुचाकीवरून गोवंडीतील महिलेवर हल्ला करत मंगळसुत्राची चोरी केली. दोघांनाही या गुह्यांत अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध गोवंडी, मानखुर्द, टिळक नगर, देवनार, चेंबूर, भायखळा, ठाण्यातील नौपाडा आणि नवी मुंबईतील सानपाडा पोलीस ठाण्यात एकूण १६ गुन्हे दाखल आहेत. पोलीस त्यांच्याकडे अधिक चौकशी करत आहेत.