एएनसीची कारवाई : १०२ किलो गांजा जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई उपनगरासह महाविद्यालयीन परिसरातील तरुणांना गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या दुकलीला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून सुमारे २० लाख रुपयांचा तब्बल १०२ किलो गांजा जप्त करण्यात आला. परवेज हसीन खान (४१) आणि शफीक बाबा मिया शेख (३५) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
एएनसीने दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपर - अंधेरी लिंक रोड येथील भीमनगर चाळीतून बुधवारी दुपारी ३ वाजता ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या कारच्या झडतीत २० लाख ४० हजार रुपयांचा १०२ किलो गांजा सापडला. दोघेही अंधेरी येथील रहिवासी आहेत. तेलंगणामधून त्यांनी हा गांजा आणल्याचे चौकशीत समोर आले. तसेच हा गांजा मुंबई उपनगरासह महाविद्यालयीन परिसरातील तरुणांना विक्रीसाठी आणल्याचेही समोर आले. या प्रकरणी दोघांकडे अधिक तपास सुरू आहे. एएनसीच्या वांद्रे युनिटचे प्रभारी अनिल वाढवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.
.............................