Join us

डबा घसरला, हार्बर ४ तास ठप्प

By admin | Published: September 15, 2015 5:24 AM

हार्बरवासीयांना सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. सीएसटी स्थानकात येणाऱ्या एका लोकलचा डबा सायंकाळी रुळावरून घसरल्याने

मुंबई : हार्बरवासीयांना सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. सीएसटी स्थानकात येणाऱ्या एका लोकलचा डबा सायंकाळी रुळावरून घसरल्याने हार्बरची लोकलसेवा ब्लॉक झाली आणि हार्बर प्रवाशांचे चार तास प्रचंड हाल झाले. वांद्रे येथून सीएसटी स्थानकाच्या दिशेने प्लॅटफॉर्म दोनवर संध्याकाळी सातच्या सुमारास लोकल जात असतानाच मोटरमनच्या दिशेकडील एक डबा (महिला डबा) रुळावरून घसरला. यामुळे हार्बरवरील लोकलसेवा विस्कळीत झाली. हा डबा शेजारील रुळांवर घसरल्याने त्या मार्गावरून जाणारी लोकलसेवाही बंद ठेवण्यात आली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि डबा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. सीएसटी ते वडाळापर्यंत हार्बर सेवा बंद ठेवली, तर वडाळा ते पनवेल आणि वडाळा ते अंधेरी सेवा सुरू ठेवण्यात आली. त्याचप्रमाणे सीएसटी ते कुर्ला मेन लाईनवरुन प्रवास करण्याची मुभा हार्बरवासियांना देण्यात आली. हार्बरवरील स्थानकांवर तर प्रचंड गर्दीचे चित्र होते. अंधेरीला जाणाऱ्यांनी परेलपर्यंतचा प्रवास करत तेथून एलफिस्टन स्थानक गाठले व पुढे अंधेरीपर्यंतचा प्रवास केला. रात्री अकरानंतर घसरलेला डबा काढून हार्बर मार्ग पूर्ववत करण्यात आला. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले.