Join us  

पोलीस दक्षता सोसायटी परिसरात घाणीचे साम्राज्य

By admin | Published: May 15, 2016 4:13 AM

इमारतींच्या बाजूला गटारे फुटलेली, रस्त्यांवर सांडपाणी आणि परिसरात कचऱ्याचे ढिग अशी काहीशी परिस्थती सध्या घाटकोपरच्या पोलीस दक्षता सोसायटी परिसरात आहे

मुंबई : इमारतींच्या बाजूला गटारे फुटलेली, रस्त्यांवर सांडपाणी आणि परिसरात कचऱ्याचे ढिग अशी काहीशी परिस्थती सध्या घाटकोपरच्या पोलीस दक्षता सोसायटी परिसरात आहे. या अस्वच्छतेमुळे येथे साथीचे आजार पसरत असून, महापालिकेने तत्काळ साफसफाई करावी, अशी मागणी गेल्या कित्येक महिन्यांपासून स्थानिक करत आहेत, परंतु याकडे महापालिकेने कानाडोळा केला असून, येथील अस्वच्छतेमध्ये भरच पडत असल्याचे चित्र आहे.घाटकोपर येथील रमाबाई कॉलनीच्या मागील बाजूस ही पोलीस दक्षता सोसायटी आहे. गेल्या काही महिन्यांपासून या सोसायटीच्या बाजूला असलेल्या मुख्य रस्त्यांवर जलवाहिनी नादुरुस्त असल्याने येथील रस्ते जलमय होत आहेत. त्यामुळे परिसरात चिखल होत असून, दुर्गंधी वाढत आहे. त्यातच येथील गटारे पालिकेने अनेक महिन्यांपासून साफ केलेली नाहीत. त्यामुळे ती तुंबलेली आहेत. सांडपाण्याच्या टाक्या पालिकेने कित्येक महिने साफच केलेल्या नाहीत. परिणामी, त्याही पूर्ण भरल्या असून, त्यातील सांडपाणी रस्त्यावर वाहते आहे. या अस्वच्छतेमुळे परिसरातील घाणीचे साम्राज्य वाढत असून, डासांचे प्रमाण वाढल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. दक्षता पोलीस सोसायटीने महापालिकेला पत्राद्वारे समस्यांची माहिती दिली आहे. मात्र, महापालिकेकडून काहीच कार्यवाही केली जात नाही, अशी खंत संबंधितांनी व्यक्त केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, रहिवाशांनी यापूर्वी स्वखर्चातून येथील साफसफाई केली आहे. मात्र, वारंवार हे शक्य नसल्याने महापालिकेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी येथून जोर धरत आहे. (प्रतिनिधी)