डम्पिंग ग्राउंडला ‘मार्ग’ सापडला
By Admin | Published: August 18, 2016 05:11 AM2016-08-18T05:11:05+5:302016-08-18T05:11:05+5:30
शहराच्या कचऱ्याचा भार पेलणाऱ्या डम्पिंग ग्राउंडमधील कच्चा रस्त्यांची दुरवस्था आहे़ याचा परिणाम कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांच्या फेऱ्यांवर होत आहे़, तसेच आगीच्या
मुंबई : शहराच्या कचऱ्याचा भार पेलणाऱ्या डम्पिंग ग्राउंडमधील कच्चा रस्त्यांची दुरवस्था आहे़ याचा परिणाम कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांच्या फेऱ्यांवर होत आहे़, तसेच आगीच्या दुर्घटना डम्पिंग ग्राउंडवर वारंवार घडत असताना, रस्त्याअभावी आगीचे बंब त्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब होतो़ त्यामुळे मुलुंड, देवनार आणि कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडवर लवकरच रस्ता बांधण्यात येणार आहे़
देवनार व मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असतात़ यामुळे प्रदूषण व स्थानिक रहिवाशांचे आरोग्यही धोक्यात आहे़ डम्पिंग ग्राउंडमध्ये रस्ताच नसल्याने येथील आग विझविण्यासाठी बंब पोहोचण्यातही अनंत अडचणी येत असतात.
तसेच इतर सेवा पुरविणाऱ्या वाहनांना ये-जा करण्यासाठीही रस्त्याची गरज असल्याने, सिमेंट काँक्रिटचा रस्ता बांधण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे़
त्यानुसार, मुलुंड, कांजूर आणि देवनार या तीन डम्पिंग ग्राउंडवर रस्ता बांधण्यासाठी २८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे़ याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी येत आहे़ यासाठी तीन स्वतंत्र रस्ते व त्याचे आराखडे तयार करण्यात आले आहेत़ मे़एम़ई़ इन्फ्राप्रोजेक्टस् यांना हे काम देण्यात येणार आहे़ रस्ता तयार झाल्यास डम्पिंग ग्राउंडवर कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांचा वेग वाढेल, असा पालिकेचा अंदाज आहे़ (प्रतिनिधी)
काँक्रिटचा रस्ता : स्थायी समितीच्या सूचना
मुलुंड डम्पिंग ग्राउंड : येथे २३० मीटर लांबीचा काँक्रिटचा रस्ता तयार करण्यात येणार आहे़ या रस्त्याचा हमी कालावधी १० वर्षे आहे़ सध्या या डम्पिंग ग्राउंडच्या रस्त्यांची दुरवस्था असल्याने वाहने सावकाश चालवावी लागतात़ त्याचा परिणाम कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांच्या फेऱ्यांवर होत असल्याने तातडीने कामाची गरज आहे़ रस्ता खचणार नाही, याची काळजी घेणे, कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांवरील चालकांना रात्रीच्या वेळी येथे वाहने चालविणे शक्य होण्यासाठी दिवाबत्ती किंवा हायमास्टचे दिवे लावावेत, अशा सूचना स्थायी समितीने केल्या आहेत.
कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड : काँक्रिटचा रस्ता करण्यासाठी रस्त्याची एक बाजू पूर्णपणे बंद करून रस्त्याची दुसरी बाजू वाहनांसाठी खुली ठेवण्यात येईल़ रस्त्याच्या बंद करण्यात आलेल्या बाजूचे काँक्रिटीचे काम २० दिवसांच्या अंतराने सिमेंटचे स्लॅब टाकून करण्यात येईल़ कांजूरला डांबरी रस्ता बांधण्यात येणार आहे़ या डम्पिंग ग्राउंडचा रस्ता पूर्व द्रुतगती महामार्गापासून ते क्षेपण भूमीपर्यंतच्या प्रवेशद्वारापर्यंत अंदाजे अडीचशे मीटर लांबीचा बनविण्यात येणार आहे़ त्याचा हमी कालावधी दोन वर्षे आहे़ एमएमआरडीएकडे असलेल्या या रस्त्याचा ताबा आता पालिकेकडे आहे़
देवनार डम्पिंग ग्राउंड : १९२६ पासून देवनार डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकण्यास सुरुवात झाली़ ९० वर्षे जुन्या असलेल्या या डम्पिंग ग्राउंडवरदीड किलोमीटर लांबीचा डांबरी रस्ता तयार करण्यात येणार आहे़ मात्र, याचा हमी कालावधी केवळ दोन वर्षे असणार आहे.