हाइट बॅरिअरला डंपरची धडक; चालक ठार मुंबई सेंट्रल जंक्शनजवळील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 10:40 AM2024-05-13T10:40:27+5:302024-05-13T10:41:05+5:30
याप्रकरणी कंत्राटदार ब्रीज कॉर्पोरेशनचे सुपरवयाझर, ठेकेदार आणि संबंधित जबाबदार व्यक्तीविरुद्ध नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मुंबई : अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यासाठी बसवलेल्या हाइट बॅरिअरला डंपरची धडक बसल्याने डंपर चालक रामू कवलधारी यादव (वय ५७) याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. याप्रकरणी कंत्राटदार ब्रीज कॉर्पोरेशनचे सुपरवयाझर, ठेकेदार आणि संबंधित जबाबदार व्यक्तीविरुद्ध नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मुंबई सेंट्रल जंक्शनजवळील रेल्वे पूल जुना झाल्याने अवजड वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यासाठी शुक्रवारी रात्री पुलाच्या सुरुवातीला ३.५० मीटर उंचीचा हाइट बॅरिअर बसविण्यात आला होता. शनिवारी पहाटे ५ वाजता मुंबई सेंट्रल जंक्शनकडून निघालेला डंपर या बॅरिअरला धडकला. लोखंडी चॅनल तुटून डंपरच्या केबिनवर चालकाच्या बाजूला कोसळला. त्यामुळे चालक यादव यांचे डोके स्टिअरिंगमध्ये अडकल्याने ते गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. क्रेनने चालकाला स्टिअरिंगमधून काढून रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
याप्रकरणी परळ परिसरात राहणारे चेतन रामप्रसाद गुप्ता (३५) यांनी नागपाडा पोलिसांत तक्रार दिली. लोखंडी ‘सी चॅनल’ बॅरिअर लावल्यानंतर कोणतीच खबरदारी घेण्यात आली नव्हती, तसेच कोणतेही सूचना फलक लावलेले नसल्याने डंपर चालकास हे लोखंडी बॅरिअर दिसले नाहीत. संबंधित कंत्राटदार या चालकाच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. त्यानुसार, संबंधित ब्रीज कॉर्पोरेशनचे सुपरवयाझर, ठेकेदार आणि संबंधित जबाबदार व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
‘केबिनमध्ये असल्याने थोडक्यात बचावलो’-
चेतन गुप्ता हे मदतनीस म्हणून यादव यांच्या मालकीच्या डंपरमध्येच होते. अपघातात बॅरिअर थेट केबिनमध्ये चालकाच्या दिशेने कोसळल्यामुळे यादव यांचा मृत्यू झाला. मात्र, मी चालकाच्या सीटच्या मागे असल्यामुळे थोडक्यात बचावल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.