रे रोड पुलाच्या पिलरला डम्परची धडक; पूल वाहतुकीसाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 01:10 AM2019-09-12T01:10:10+5:302019-09-12T01:10:17+5:30
मुंबई : सर्वांत जुन्या पुलांपैकी एक असलेल्या रे रोड येथील पुलाच्या पिलरला बुधवारी सकाळी एका डम्परने धडक दिली. ही ...
मुंबई : सर्वांत जुन्या पुलांपैकी एक असलेल्या रे रोड येथील पुलाच्या पिलरला बुधवारी सकाळी एका डम्परने धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की त्या डम्परच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. धोकादायक असलेला हा पूल या दुर्घटनेनंतर वाहतुकीसाठी तत्काळ बंद करण्यात आला आहे. तसेच या पुलावर भार वाढविणारे अतिक्रमणही हटविण्यात येत आहे.
मुंबईतील बहुतांशी जुन्या पुलांची दुरवस्था झाली आहे. रे रोड हा त्यातीलच एक पूल आहे. हा पूल काही महिन्यांपूर्वीच असुरक्षित असल्याचे आढळून आले होते. तसेच या पुलाजवळील मलनिस्सारण वाहिन्या, सेवा कंपन्यांच्या केबल्स पुलाला आणखीनच कमकुवत करीत होत्या. त्याचबरोबर अनधिकृत दुकाने, फेरीवाल्यांचेही यावर बस्तान असल्याने धोका वाढला होता. मात्र बुधवारी डम्परचा धक्का लागून पिलर कमकुवत झाला. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.