Join us  

डम्पिंगची वाढती दुर्गंधी उपनगरांच्या मुळावर !

By admin | Published: October 25, 2015 1:59 AM

नुसता ‘डम्पिंग’ शब्द उच्चारला तरी हात आपोआप नाकावर जातो. सध्या मुंबई महानगरातील सर्वांत भीषण समस्या म्हणजे डम्पिंगची. वाढत्या कचऱ्यामुळे मुंबई शहरासह उपनगरांवर प्रचंड

- सचिन लुंगसेनुसता ‘डम्पिंग’ शब्द उच्चारला तरी हात आपोआप नाकावर जातो. सध्या मुंबई महानगरातील सर्वांत भीषण समस्या म्हणजे डम्पिंगची. वाढत्या कचऱ्यामुळे मुंबई शहरासह उपनगरांवर प्रचंड ताण येत आहे. आरोग्याच्या अनेक बिकट समस्या निर्माण होत आहेत. पुढे तर हे स्वरूप अधिक गंभीर होत जाणार आहे. डम्पिंगच्या या प्रश्नाला अनेक पैलू आहेत. यावर प्रकाश टाकणारा लेख...मुंबईतल्या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न हा काही नवा नाही. तो जुनाच आहे. देवनार, मुलुंड किंवा कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न हा गेल्या काही वर्षांत चिघळला आहे. तोसुद्धा भांडुप, विक्रोळी, कांजूर आणि लगतच्या परिसरातील रहिवाशांना त्रास जाणवू लागल्यानंतर. अगदी काही वर्षांपूर्वी धारावीच्या जागेवरही डम्पिंग ग्राउंड होते. कालांतराने येथे वस्ती वसू लागली आणि डम्पिंग नामशेष झाले. धारावीमध्ये आजही खोलवर खणण्यात आले, तर तिथे डम्पिंगच्या ‘खुणा’ आढळतील, अशी माहिती पालिकेचे सूत्र देतात.मुद्दा डम्पिंगमधून येणाऱ्या कचऱ्याच्या दुर्गंधीचा व दररोज जमा होणारा कचरा नक्की टाकायचा कुठे? हा आहे. आता जे डम्पिंग ग्राउंड आहेत, त्यावर प्रोसेसिंग युनिट सुरू करायचे म्हटले, तरी पालिका प्रशासनाला याबाबतची परवानगी मिळविण्यासाठी कालावधी लागणार आहे. तोवर डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याचे ढिगारे उभे राहत आहेत. यामुळे त्यालगत राहणाऱ्या रहिवाशांच्या नाकीनऊ आले आहेत. सद्यस्थितीत मुंबईत देवनार, मुलुंड आणि कांजूरमार्ग असे तीन डम्पिंग ग्राउंड आहेत. त्यापैकी देवनार आणि मुलुंड या दोन डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकला जात आहे. कांजूरमार्ग येथे गॅस प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. बायोरिअ‍ॅक्टर तंत्रज्ञानाच्या आधारे व प्राणवायू विरहित (अनॉरोबिक) पद्धतीने प्रक्रिया करणारा हा देशातील पहिला प्रकल्प आहे. महत्त्वाचे म्हणजे, हा प्रकल्प यशस्वीरीत्या कार्यान्वित झाला असून, त्यातून गॅसची निर्मिती सुरू झाली आहे. प्रकल्पातून प्राप्त झालेले पाणी बागेतील झाडांना देण्यासाठी अथवा पिण्या व्यतिरिक्तच्या इतर कामांसाठी वापरता येणार आहे., तसेच गॅस वातावरणात मिसळून परिसरात दुर्गंधी पसरू नये, याकरिता गॅसचे ज्वलन केले जात आहे.१९२४ साली सुरू झालेले देवनार डम्पिंग ग्राउंड १२० हेक्टर जागेवर पसरलेले आहे. दररोज येथे ३ हजार ८०० मेट्रीक टन एवढा कचरा जमा होत आहे. येथे कचरा प्रक्रिया करण्यासाठी प्रोसेसिंग युनिट उभे करायचे म्हटले, तरी पालिका प्रशासनासमोर खूप अडचणी आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, येथे प्रोसेसिंग युनिट उभे करायचे झाल्यास किमान तीन वर्षे लागतील. १९६५ साली सुरू झालेल्या मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर आजघडीला दररोज २ हजार २०० मेट्रिक टन कचरा जमा होतो आहे. पालिका सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथेही भविष्यात बायो मायनिंग प्लान्ट उभारला जाणार आहे. या प्रकल्पाची किंमत सुमारे १० हजार कोटी असणार आहे, पण डम्पिंग ग्राउंडवर असे प्रकल्प राबविताना महापालिकेला अनेक अडचणी येतात. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक नियमांत येथील प्रकल्प अडकतात. मग प्रकल्पासाठी दाखल झालेल्या कंपन्या माघार घेतात. परिणामी, प्रकल्पांसाठी आवश्यक परवानग्या मिळण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागतो. त्यात हे प्रकरण जर न्यायालयात दाखल झाले, तर अंतिम सुनावणी होईपर्यंत पालिकेला कार्यवाही करता येत नाही.कचऱ्यातल्या डेब्रिजचे करायचे काय?मुंबई शहर आणि उपनगरात मोठया प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. दुरुस्तीच्या कामांचे प्रमाणही अधिक आहे. या कामातून निर्माण होणारे डेब्रिजही कचऱ्यात ओतले जात असल्याने, कचऱ्याचा प्रश्न अधिकच बिकट झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे, अनेकवेळा रात्री-अपरात्री शहर आणि उपनगरातील रस्त्यांवर डम्परचे ट्रक ओतले जातात. अशा डम्परवर आळा घालण्यात महापालिका सपशेल अपयशी ठरली आहे. कचऱ्यातले डेब्रिजही तोंड ‘आ’ वासून उभे राहिले आहे.मुंबईत दररोज जो कचरा जमा होतो, त्यात किमान दहा ते पंधरा टक्के हे डेब्रिज असते. या डेब्रिजची विल्हेवाट कशी लावायची? हा दुसरा प्रश्न महापालिकेसमोर आहे. विशेषत: मुंबई आणि उपनगरातील रस्त्यांवर रात्री-अपरात्री काही डम्परकडून डेब्रिज ओतले जाते. ते डेब्रिज उचलण्यासाठी जोवर महापालिका काही कारवाई करत नाही, तोवर ते रस्त्यांवर तसेच पडून असते. रस्त्यांवर ठिकठिकाणी टाकण्यात आलेल्या डेब्रिजचा मुंबईकरांना त्रास होतो. यावर नामी शक्कल म्हणून रस्त्यांवर रात्री-अपरात्री डेब्रिज ओतणाऱ्या डम्परची छायाचित्रासह सविस्तर माहिती दिली, तर अशा सजग नागरिकांना चक्क १० हजार रुपये बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा महापालिकेने केली होती. रस्त्यांवर दगडमाती टाकणाऱ्या डम्पर मालकांना आळा घालण्यासाठी ही युक्ती हाती घेण्यात आली. प्रत्यक्षात मात्र पालिकेने अद्याप या प्रकरणी काहीच कारवाई केलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे.या डेब्रिजचा नागरिकांना त्रास होऊ नये आणि ते उचलण्यात यावे, म्हणून महापालिकेने ‘डेब्रिज आॅन कॉल’ ही सेवा सुरू केली. नागरिकांना विभागनिहाय संपर्क करण्याकरिता घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या ‘स्वच्छ भारत अभियान नियंत्रण कक्षा’च्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. अद्यापही कचऱ्यातल्या डेब्रिजचा प्रश्न काही महापालिकेला सोडविता आलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.पर्यावरणाची हानीमुंबईतल्या वाढत्या कचऱ्याने प्रदुषणाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. विषारी वायू बाहेर पडून येथील हवा प्रदूषित होत आहे. येथील डम्पिंग ग्राउंडविरोधात नागरिकांनी ‘एल्गार’ पुकारला आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, उंचावलेले राहणीमान, औद्योगिकरण, प्लॅस्टिकच्या वाढत्या वापरामुळे तयार होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण व प्रकार वाढत जात आहेत. त्यामुळे समस्यांमध्येही भर पडत आहे. परिणामी, अस्वच्छता, आजार, प्रदूषण आणि पर्यावरणाचे नुकसान असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. महत्त्वाचे म्हणजे डम्पिंग ग्राऊंड व्यतिरिक्त समुद्रकिनारी वसलेल्या मुंबईचा कचरा खाड्यांमध्ये टाकला जात असल्याने, प्रदूषणाचा प्रश्न आणखीच बिकट होत चालला आहे. डम्पिंगवरील कचऱ्यामुळे पूर्व उपनगरातील हवा अधिकच प्रदूषित होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. भांडुप, विक्रोळी, देवनार आणि मुलुंड येथील सर्वच रहिवाशांनी पावसाळ्यात डम्पिंगमधून निघणाऱ्या दुर्गंधीचा सर्वाधिक त्रास होत असल्याचे म्हटले आहे. शिवाय दररोज सायंकाळी वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे डम्पिंगमधून येणाऱ्या दुर्गंधीचा त्रास रोजचा झाला आहे. मुळात भविष्यात वाढत जाणारा कचरा आणि त्यामुळे होणारे एकूणच परिणाम पाहता, कचऱ्याच्या समस्येकडे प्राधान्याने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.