डम्पिंगवरून विरोधकांचा हल्लाबोल
By admin | Published: March 30, 2016 01:59 AM2016-03-30T01:59:10+5:302016-03-30T01:59:10+5:30
मुंबईतील कचराप्रश्न हाताळण्यात अपयशी ठरलेल्या शिवसेना-भाजपा युतीला कोंडीत पकडण्याची रणनीती विरोधी पक्षांनी आखली आहे़ देवनार डम्पिंग ग्राउंडवरील आगीमुळे ही संधी आयती
मुंबई : मुंबईतील कचराप्रश्न हाताळण्यात अपयशी ठरलेल्या शिवसेना-भाजपा युतीला कोंडीत पकडण्याची रणनीती विरोधी पक्षांनी आखली आहे़ देवनार डम्पिंग ग्राउंडवरील आगीमुळे ही संधी आयती चालून आल्याने विरोधी पक्षांनी आज सत्ताधाऱ्यांना घेराव घेतला़ मात्र महापौरांनी देवनार आगीवरील निवेदनावर चर्चा नाकारून विरोधकांची पंचाईत केली़ याविरोधात विरोधी पक्षांनी असहकार पुकारल्यामुळे महापौरांनीही तासाभरात सभागृहाचे कामकाज गुंडाळले़
डम्पिंग ग्राउंडवरील आगीने गेले दीड ते दोन महिने देवनारकर जीव मुठीत घेऊन जगत आहेत़ डम्पिंगच्या त्रासातून मुंबईकरांना सोडवा, अशी विनंती विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी केली़ कचरामाफिया, बांधकाममाफिया, भंगारमाफिया व बेकायदा झोपड्या यांच्या विळख्यातून मुंबईकरांची सुटका करण्याची विरोधी पक्षांनी मागणी केली़ मात्र या निवेदनावर चर्चा करण्याची परवानगी देण्यास महापौरांनी नकार दिला़ यामुळे विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली़ अखेर महापौरांनी कामकाज तासाभारात उरकून आपली सुटका करून घेतली़ (प्रतिनिधी)
पोलिसांची मदत घेणार
गेला दीड महिने धगधगणाऱ्या देवनार डम्पिंग ग्राउंडवर बेकायदा प्रवेशावर नियंत्रण यावे, डम्पिंग ग्राउंडची संयुक्त पाहणी करण्यात यावी, तेथे सुरू असलेल्या संरक्षण भिंतीच्या दुरुस्तीचे काम आणि बांधकाम व्यवस्थितपणे व्हावे, तसेच सुरक्षाविषयक अडचणी निर्माण होऊ नये, याकरिता महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची भेट घेली़ पोलीस आयुक्तांनीही सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दाखविली आहे़