Join us

मुंबईला डेंग्यूचा ‘डंख’; १५ दिवसांत तीन बळी, लेप्टोमुळेही दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 2:50 AM

२९ आॅगस्टला झालेल्या अतिवृष्टीनंतर शहर-उपनगरात डेंग्यू आणि मलेरियाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. सप्टेंबरच्या १५ दिवसांतच डेंग्यूने एकूण तीन जणांचा जीव घेतला.

मुंबई : २९ आॅगस्टला झालेल्या अतिवृष्टीनंतर शहर-उपनगरात डेंग्यू आणि मलेरियाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. सप्टेंबरच्या १५ दिवसांतच डेंग्यूने एकूण तीन जणांचा जीव घेतला. यात दोन बालकांचा समावेश आहे. याशिवाय, लेप्टोनेही दोन जणांचा बळी घेतल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीतून समोर आले आहे.पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जुहूतील ९ वर्षीय मुलाचा १० सप्टेंबरला डेंग्यूमुळे मृत्यू झाला. तर त्याच दिवशी धारावीतील दीड वर्षीय चिमुरडीचाही डेंग्यूने जीव घेतला. पाच दिवसांपूर्वी हाँगकाँगहून आलेल्या निद्रानाश, अतिलठ्ठपणाचा त्रास असलेल्या वांद्रे येथील ३४ वर्षीय तरुणाचा ५ सप्टेंबरला डेंग्यूमुळे मृत्यू झाला. लेप्टोनेही घाटकोपर येथील १९ वर्षीय तरुणाचा व अंधेरी येथील २७ वर्षीय तरुणाचा अनुक्रमे ६, १५ सप्टेंबर रोजी मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.घाटकोपर व अंधेरी भागात करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत १ हजार २६० घरांना भेटी देण्यात आल्या. त्यात ५ हजार ७६० लोकांची तपासणी करण्यात आली. यात ७ जणांना ताप, ९ जणांना कफ तर ४ डायरियाचे रुग्ण आढळले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच उंदीर शोधण्यासाठी १२८ घरांना भेटी देऊन ११० बिळांमध्ये उंदीर मारण्याचे औषध टाकले. तर वांद्रे, जुहू व धारावी परिसरात १ हजार ६५३ घरांना भेटी देत ७ हजार १९५ लोकांची तपासणी केली. त्यात १२ लोकांना ताप, ७ जणांना कफ आणि ३ डायरियाचे रुग्ण आढळले.

टॅग्स :मुंबई