माटुंगा आश्रमातून बेपत्ता झालेल्या अन्य दोघींचाही लागला शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 01:49 AM2019-01-22T01:49:11+5:302019-01-22T01:49:15+5:30
आश्रमातील वातावरणाला कंटाळून पळालेल्या तिन्ही मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले.
मुंबई :आश्रमातील वातावरणाला कंटाळून पळालेल्या तिन्ही मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले. यापूर्वी एका मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्या चौकशीतून अन्य दोघींचाही शोध घेतला आहे. तिघींकडे पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
माटुंगा येथील श्रद्धानंद महिला आश्रमातून १७ डिसेंबर रोजी आश्रमातील नेहा (१५), रेश्मा (१५) आणि निधी (१२) (नावात बदल) या तीन मुली बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली. खेळता-खेळता अवघ्या अर्ध्या तासात या मुली भिंतीवरून उड्या मारून बाहेर पडल्या. मुलींचा शोध घेऊनही काहीच थांगपत्ता न लागल्याने, आश्रमातील केअर टेकर दर्शना शेटे यांच्या तक्रारीवरून माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकारानंतर आश्रमाने केअर टेकरवरही कारवाई केली होती.
माटुंगा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलींच्या शोधासाठी पथके तयार केली. हाती लागलेल्या सीसीटीव्हीमध्ये त्या भिंतीवरून उड्या मारून बाहेर पडल्याचे निदर्शनास आले. त्या दिशेने पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यापैकी एका मुलीला शिवाजी पार्क येथून ताब्यात घेण्यात आले आहे. तिच्या चौकशीतून त्यांनी अन्य दोघींचा शोध घेणे सुरू केले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
अन्य दोघींनाही नुकतेच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या दोघी मैत्रीण, तसेच नातेवाइकांकडे राहात होत्या. आश्रमात राहण्याचा कंटाळा आला म्हणून त्यांनी पळ काढल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत. त्यांच्या पळून जाण्यामागे आणखी कुणाचा हात आहे का, या दिशेनेही पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.