मुंबईत कोरोना रुग्णदुपटीचा कालावधी ६६ दिवसांवर; दिवसभरात २,३५२ बाधितांचे निदान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 02:40 AM2020-10-02T02:40:19+5:302020-10-02T02:41:43+5:30
मुंबईत गुरुवारी कोरोनाचे २ हजार ३५२ रुग्ण आढळले असून ४३ मृत्यूंची नोंद झाली आहे.
मुंबई : मुंबईत दिवसभरात कोरोनाचे १ हजार ४१० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत १ लाख ७० हजार ६७८ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्के असून, रुग्णदुपटीचा काळ ६६ दिवसांवर पोहोचला आहे.
मुंबईत गुरुवारी कोरोनाचे २ हजार ३५२ रुग्ण आढळले असून ४३ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, शहर-उपनगरात कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ७ हजार ६२० वर पोहोचली असून, मृतांची संख्या ८ हजार ९७२ झाली आहे. दिवसभरात मृत्यू झालेल्या ४३ रुग्णांपैकी ३६ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यात ३३ पुरुष व १० महिला रुग्णांचा समावेश होता.
सप्टेंबर महिन्यात मुंबईत कोविडच्या ११ लाख २९ हजार ८६९ चाचण्या झाल्या आहेत. सध्या शहर-उपनगरातील झोपडपट्ट्या व चाळींमध्ये ६७२ सक्रिय कंटेनमेंट झोन्स आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या १० हजार २७२ झाली आहे. मुंबई महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून मागील २४ तासांत कोरोना रुग्णांच्या सहवासातील १७ हजार ८११ सहवासितांचा शोध घेतला आहे.