- महेश चेमटे, मुंबई
आदिवासी भागात वाचनालय उभारण्यासाठी मुंबईकर मुकुंद गावडे १०० तास फलंदाजी (नेट सराव) करण्याचा विक्रम करणार आहे. भारतीय क्रिकेटची पंढरी समजली जाणाऱ्या दादर, शिवाजी पार्क मैदानावर बुधवारी सायंकाळी ६ वाजता मुकुंदने फलंदाजीच्या सरावास प्रारंभ केला आहे. दुर्गभ्रमंतीची आवड असलेल्या मुकुंदने फलदांजीचा विक्रम पूर्ण केल्यास गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद होणार आहे. मुंबईजवळील सफाळे आदिवासी भागात वाचनालय उभारण्यासाठी आणि आर्थिक अडचणीमुळे शिक्षण सोडणाऱ्या आदिवासी मुलींसाठी विक्रमी खेळातून मदतनिधी उभारण्यात येणार आहे. समन्वय प्रतिष्ठान आणि कीर्ती संजीवनी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या विक्रमी खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. काळाचौकी परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय मुकुंदला क्रिकेटसह दुर्गभ्रमंतीचीही आवड आहे. आजपर्यंत त्याने ५८ किल्ल्यांची भ्रमंती केली आहे. भविष्यात मुकुंदला भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवायचे आहे.कोण आहे मुकुंद गावडे? काळाचौकी परिसरातील एका सामान्य कुटुंबातील खेळाडू. वडील खासगी कंपनीत कामाला होते. काम सुटण्यासह वडिलांच्या आजारपणामुळे आईवर घराची जबाबदारी आली. बहिणीने बारावीपर्यंत शिक्षण घेतले असून, घर चालविण्यासाठी आईला मदत करत आहे. कीर्ती महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मुकुंद याने डिजिटल डिझायनिंग अभ्यासक्रम पुण्यातील एम.आय.टी.मधून पूर्ण केला.‘एक चेंडू विक्रमासाठी, एक पाऊल आदिवासी शिक्षणासाठी’पार्कात सराव करणाऱ्या खेळाडूंना तसेच प्रभात फेरीसाठी येणाऱ्या नागरिकांना मुकुंदला गोलंदाजी करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात येते. आयोजकांच्या ‘एक चेंडू विक्रमासाठी, एक पाऊल आदिवासी शिक्षणासाठी’ या सादाला मुंबईकर मोठ्या संख्येने प्रतिसाद देत आहे. प्रत्यक्षात आदिवासी भागात जाणे शक्य नसल्याने नागरिक गोलंदाजी करून आर्थिक मदत करतात. हा मदतनिधी आदिवासी पाड्यावर शिक्षणासाठी खर्च करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. ‘तो’ विक्रम मोडलासलग ५० तास फलदांजी करण्याचा विक्रम पुण्यातील विराग मारेच्या नावावर होता. मुकूंद गावडेने विरागचा ५० तासांचा विक्रम शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास मोडीत काढला. शेतकरी कुटूंबात जन्मलेला २४ वर्षीय विरागने कॅन्सरग्रस्तांना मदतनिधी उभारण्यासाठी स्पोटर््स डे फाऊंडेशनच्या मदतीने हा विक्रम रचला होता.असा रचणार विक्रमक्रिकेटच्या नियमांनुसार, नेट सराव करताना दर तासाला ५ मिनिटे विश्रांती घेण्याची मुभा आहे. यानुसार चार तासांनी मुकुंद २० मिनिटांची विश्रांती घेतो. सिंथेटिक बॉलने नेट सराव करण्याचा विक्रम मुकुंद रचणार आहे. सुनील इलेव्हन, सेंट जॉर्ज क्रिकेट क्लब, यंग फ्रेण्ड्स क्रिकेट क्लबमधील खेळाडू गोलंदाजी करत आहेत. शनिवारी रात्री १२ वाजता त्याचे सलग ७१ तास खेळून झाले आहेत. पुढील खेळी सुरू आहे.कौतुकास्पद विक्रमप्रसिद्धिझोतात येण्यासाठी विविध खेळाडू सतत धडपड करतात. अशा खेळाडूंमधील एक मुकुंद गावडे आहे. खेळाडूंनी याचा वापर आपले करिअर घडविण्यासाठी करावा. मुकुंदच्या विक्रमाचे कौतुक आहे; पण भविष्यात क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी अथक परिश्रम, सातत्य आणि चिकाटी अंगी असणे गरजेचे आहे. १०० तास फलंदाजी हा विक्रम म्हणून स्तुत्य असला तरी प्रत्यक्षात सामन्यातील कामगिरी महत्त्वाची ठरते.- रणजित दळवी, ज्येष्ठ क्रीडा समीक्षक