तबेला चालकावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पतंग पकडण्याच्या नादात चिखल आणि शेणाने भरलेल्या खड्ड्यात बुडून दुर्गेश जाधव (१०) या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा वयोवृद्ध तबेला चालकावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला. या खड्ड्याच्या खोलीबाबत स्थानिकांनी माहिती नसल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.
जाधवने ज्या खड्ड्यात पडून जीव गमावला तो जवळपास ५ फूट खोल आहे. मात्र, याबाबत स्थानिकांपैकी कोणालाही कल्पना नव्हती तसेच त्याबाबत उल्लेख असणारा एखादा फलकही त्याठिकाणी लावण्यात आलेला नव्हता. तसेच आसपास पत्रे लावून प्रवेश बंदही करण्यात आला नव्हता. या खड्ड्यात शेण आणि पाणी भरण्यात आल्याने तो वरून पाहताना मोकळ्या जागेशी समांतरच दिसत होता. त्यामुळे जाधवला खड्ड्याबाबत अंदाज आला नाही आणि पतंग पकडण्याच्या नादात तो त्याठिकाणी गेला. ज्यात खड्ड्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. ही बाब चौकशीत पुढे आल्यावर पोलिसांनी तबेला चालकावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला. हा तबेला चालक वयोवृध्द असून, त्याला अटक करण्यात येणार आहे. युसुफ नामक व्यक्तीने त्याला गटांगळ्या खाताना पाहिले आणि त्याच्या मदतीसाठी धावला. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांना विचारले असता, आम्ही तबेला चालकावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला असून, त्याला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.