मुंबई : कोरोनाने भारतात शिरकाव केल्यानंतर विमान वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात आले. लॉकडाऊनचे नियम हळूहळू शिथिल केल्यानंतर मे महिन्यात देशांतर्गत विमान वाहतुकीस परवानगी देण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत (२५ मे २०२० ते १५ मार्च २०२१) तब्बल ५ कोटी १२ लाख ३५ हजार २९२ प्रवाशांनी देशांतर्गत प्रवासासाठी विमान वाहतुकीचा अवलंब केला आहे.
कोरोनाकाळात वाहतूक सुरू केल्यापासून आतापर्यंत तब्बल ४ लाख ८० हजार ५३९ विमानांनी उड्डाण केले. त्याद्वारे ५ कोटी १२ लाख ३५ हजार २९२ प्रवाशांची वाहतूक करण्यात आल्याची माहिती विमानतळ वाहतूक प्राधिकरणाकडून देण्यात आली.
कोरोनाकाळात परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून वंदे भारत अभियान राबवण्यात आले. त्याअंतर्गत सोमवार, १५ मार्च रोजी ७१०५ प्रवासी विविध देशांतून भारतात दाखल झाल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिली. या अभियानांतर्गत आतापर्यंत तब्बल ६.६ मिलियन प्रवाशांना भारतात आणण्यात यश आल्याचे त्यांनी ट्विटरद्वारे सांगितले.